अतिक्रमण हटाव मोहिमेला गालबोट; व्यापाऱ्यांची कराड बंदची हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“स्वच्छ कराड, सुंदर कराड” मोहिमेअंतर्गत कराडमध्ये चांगले काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होतो म्हणून सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला गालबोट लागले. रस्त्यावरील अतिक्रमण काढताच व्यावसायिक दुकानावरील फलक हटवण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनाने राबवल्याबद्दल कराडकर संतप्त झाले असून कराड नगरपालिकेने “सुंदर कराड” चे विद्रुपीकरण केले आहे, असा आरोप करत व्यापाऱ्यांनी बेमुदत कराड बंदची हाक दिली असून शनिवारी कराड बंद होते. पोलीस व नगरपालिका प्रशासनाला मोर्चाद्वारे व्यापाऱ्यांनी निवेदन दिले.

शिस्तबद्धरित्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. वास्तविक वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे हातगाडे, टपरी, खोके अतिरिक्त बांधकाम हटविण्यात आले. शुक्रवारी दुपारपासून अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने व्यवसायिक गाळ्यांवरील फलक हटविण्यास सुरुवात केली.अपवादात्मक काही फलक मोठे होते ते हटवत असतानाच रीतसर फलक आहेत. त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. यामुळे कराडच्या मुख्य बाजारपेठेला अवकळा आली असून संपूर्ण बाजारपेठचे विद्रुपीकरण झाले आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. अतिक्रमण मोहीम राबवत असताना काही ठिकाणी काहींचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून पथक पुढे गेल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने हेतुपुरस्सर काही बड्या धेंड्यांचे अतिक्रमणाला धक्का लावला नाही, अशी चर्चा सुरू आहे. कराड शहरातील सर्व लहान-मोठे व्यापाऱ्यांनी आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी स्वतःहून व्यवसायीक फलक व नगरपालिकेला अडथळा वाटेल असे अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर असलेल्या कराड शहरातील अतिक्रमण काढताना आपणच स्वच्छ कराडला गालबोट लावत आहोत अथवा स्वच्छ कराडला विद्रुपीकरण करत आहोत, याचे भान मात्र नगरपालिका प्रशासनाला राहिले नाही. शनिवारी सकाळपासून कराड शहरासह ग्रामीण भागातील लोक अतिक्रमण हटाव मोहिमेचे काम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अतिक्रमण मोहीम अशी कशी सुरू आहे ? असा प्रश्न विचारला जात होता. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर हातोडा घालताना नगरपालिका प्रशासनाने वाहतुकीला अडथळा नसणाऱ्या व्यवसायिक गाळ्यांवर जेसीपी चालवल्यामुळे कराडकर संतप्त झाले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कराड बंदची हाक दिली असून शनिवारी कराड बंद होता. वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कोणताही पक्षपातीपणा केला जात नसून अतिक्रमण मोहीम ही सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले. नगरपालिका प्रशासन जोपर्यंत अतिक्रमण मोहीम चालू ठेवेल तोपर्यंत आम्ही त्यांना पोलिस बंदोबस्त देणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी सांगितले. अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची दक्षता आम्ही घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.