
पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी करणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाला दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशीही आपली धमक दाखवता आली नाही. आपली दुसरीच कसोटी खेळणारा उंचपुरा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन ऍण्ड कंपनीच्या प्रभावी माऱ्यासमोर टीम इंडियाचा पहिला डाव 242 धावांमध्येच गडगडला. पृथ्वी शॉ (54 धावा), चेतेश्वर पुजारा (54 धावा) व हनुमा विहारी (55 धावा) यांचा अपवाद वगळता कोणालाही खेळपट्टीवर ठामपणे उभे राहता आले नाही. काईल जेमिसनचे 5 बळी शनिवारच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेरीस बिनबाद 63 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 179 धावांनी पिछाडीवर आहे.
मुंबईकराच्या 54 धावा
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ट्रेंट बोल्टने सहाव्या षटकात मयांक अग्रवालला 7 धावांवर पायचीत बाद केले. त्यानंतर मुंबईकर पृथ्वी शॉ व चेतेश्वर पुजारा या जोडीने दुसऱया विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचली. पृथ्वी शॉने 1 षटकार व 8 चौकारांसह 54 धावांची खेळी साकारली. तो स्थिरावणार असे वाटत असतानाच काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर तो टॉम लॅथमकरवी झेलबाद झाला.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान – पहिला डाव सर्व बाद 242 धावा
(पृथ्वी शॉ 54 धावा, पुजारा 54 धावा, विहारी 55, जेमिसन 45 धावा देत 5 फलंदाज बाद)
न्यूझीलंड – पहिला डाव बिनबाद 63 धावा
कोहलीची अपयशाची मालिका सुरूच
कोहलीला न्यूझीलंड दौऱयात सूर काही गवसेना. याही डावात त्याच्या अपयशाची मालिका सुरूच राहिली. न्यूझीलंड दौऱयात त्याने आतापर्यंत फक्त 204 धावा केलेल्या आहेत. यामध्ये चार टी-20, तीन वन डे व तीन कसोटी डावांचा समावेश आहे. तसेच गेल्या 21 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. अखेरचे शतक त्याने बांगलादेशविरुद्ध डे-नाईट कसोटीत झळकावले होते. टीम साऊथीने त्याला 3 धावांवर पायचीत पकडले. टीम साऊथीने त्याला दहा वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय.
जोडी तुटली अन् डावाला सुरुंग
अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी करता आली नाही. टीम साऊथीने त्याला रॉस टेलरकरवी 7 धावांवर बाद केले. यानंतर चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी या जोडीने 81 धावांची भागीदारी रचली अन् डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी या भागीदारी नेत्रदीपक फटके मारले. पण कसोटी मालिकेतील पहिलाच सामना खेळणाऱया नील वॅगनरच्या गोलंदाजीवर हनुमा विहारी 55 धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली. या खेळीत त्याने दहा चौकार मारले. 3 धावांनंतर चेतेश्वर पुजाराही 54 धावांवर बाद झाला. काईल जेमिसनने 45 धावा देत 5 फलंदाजांना बाद केले. ट्रेंट बोल्ट व टीम साऊथी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.































































