
एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थीनीचा बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. या घटनेत पीडित मुलगी 50 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणातील आरोपी व्यंकटेश हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
व्यकंटेश याचे पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो गेल्या दोन वर्षांपासून तिला लग्नाची मागणी घालत होता. पीडित मुलगी ही बारावीत शिकत होती तर व्यंकटेश हा अशिक्षित होता. त्यामुळे तिने त्याला कधीच भाव दिला नाही. पीडित मुलीचे पालक शुक्रवारी कामानिमित्त हैदराबादला गेले होते. शुक्रवारी दुपारी व्यंकटेश तिच्या घरात घुसला व त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने घरातील रेकॉल वापरून मुलीला जाळले. तिचा आरडा ओरडा ऐकून शेजारी घराचे दार तोडून घरात घुसले. मात्र तोपर्यंत व्यंकटेश मागच्या दाराने पळून गेला होता. शेजारच्यांनी आग विझवून मुलीला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.ट
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील कुडालोर येथे एका तरुणाने लष्कराच्या जवानाच्या पत्नीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात ती 30 टक्के भाजली असून तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्यात वर्ध्यातील हिंगणघाट येथे एका शिक्षिकेवर एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्यात 70 टक्के भाजलेल्या त्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.



























































