वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय एकही झाड तोडता येणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय मुंबईत यापुढे एकही झाड तोडले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांचा 25 झाडे तोडण्याचा विशेष अधिकार काढून घेण्याचा निर्णय महासभेत शिवसेनेच्या ठरावामुळे झाला होता. या निर्णयाची अंमलबजावणी आज झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीपासून सुरू झाली आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे आज 205 झाडे तोडण्याचे नऊ प्रस्ताव फेटाळून लावण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने पालिका आयुक्तांना ‘वन संवर्धन कायदा-75’ अंतर्गत 25 झाडे तोडण्यास परवानगी देण्याचा अधिकार बहाल केला होता. या निर्णयाचा गैरफायदा घेत अनेक विकासक आणि आस्थापनांनी शेकडो झाडे तोडण्यासाठी 25-25 झाडांचे वेगवेगळे प्रस्ताव आणून मंजुरी मिळवली. यामध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल 15 हजारांवर झाडे तोडण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. यामुळे मुंबईत पर्यावरण संवर्धन आणि झाडे वाचवण्यासाठी यशवंत जाधव यांनी महासभेत ठराव मांडून पालिका आयुक्तांचा 25 झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. त्यानुसार घेतलेल्या निर्णयाचे पालिका आयुक्तांनीही स्वागत केल्याची माहिती यशवंत जाधव यांनी दिली. दरम्यान, आजच्या बैठकीत 205 झाडे तोडण्याचे नऊ प्रस्ताव मांडण्यात आले होते. यामध्ये खासगी आणि काही आस्थापनांच्या कामासाठी ही झाडे तोडण्यात प्रशासनाकडून मंजुरी मागण्यात आली होती, मात्र रेल्वेच्या उपक्रमासाठी केवळ एक झाड तोडण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेमुळे तूर्तास 205 झाडांवरील कुऱहाड टळली आहे.

‘मियावाकी’ वनांचा पर्याय सर्वोत्तम ठरणार
मुंबईकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून गारगाई धरण प्रकल्प लवकरच राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून मुंबईसाठी दररोज 440 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा वाढणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पात येणारी झाडे वाचविण्यासाठी पाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी सामान्य वनांच्या तुलनेत तीनपट वेगाने वाढणारी ‘मियावकी’ वने सर्वोत्तम ठरणार असल्याचेही ते म्हणाले.