
केंद्र सरकारने अद्यापपर्यंत निर्यातबंदी उठवलेली नाही, यामुळे आठवड्याच्या सुरूवातीलाच कांद्याचे दर क्विंटलमागे चारशे रुपयांनी घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी लासलगाव, उमराणे, देवळा, मनमाड, येवला बाजार समितीत लिलाव बंद पाडून रास्ता रोको आंदोलन केले, तर पिंपळगाव येथे बाजार समितीबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. अंदरसूलला शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला, निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी करीत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी बुधवारी फक्त ट्विटरवरच निर्यात खुली केल्याचे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात अध्यादेश काढलाच नसल्याने निर्यातबंदी कायम आहे. बुधवारच्या या ट्विटनंतर एकाच दिवसात साधारण तीनशे रुपयांनी कांद्याचा भाव वधारला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दरात घसरण सुरू झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर क्विंटलमागे चारशे रूपयांनी घसरला. लासलगाव येथे सकाळच्या सत्रात अकराशे वाहनांमधून 18 हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. मात्र, किमान 900, कमाल 1652, सरासरी 1450 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले. बाजार समितीतील लिलाव संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लिलाव बंद पाडले. लासलगाव-पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू करीत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. विंचूर उपबाजार येथेही भाव घसरल्याने प्रहार संघटनेने नाशिक-संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको केला. पिंपळगाव-बसवंत बाजार समितीतही शेतकऱ्यांनी लिलाव रोखून ठिय्या आंदोलन केले. येथे दुपारच्या सत्रात लिलाव सुरळीत झाले. जिल्ह्यातील इतर नांदगाव, सायखेडा, दिंडोरी, मालेगाव, सटाणा बाजार समितीत लिलाव सुरळीत सुरू होते.
निर्यातबंदी उठवण्याचा अध्यादेश त्वरित काढावा, अशी मागणी करीत देवळा व उमराणे बाजार समितीत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. उमराणे येथे बाराशे ट्रॅक्टर आवक होती. शंभर वाहनांचा लिलाव झाल्यानंतर कमाल दर 1740, सरासरी 1300 रूपये प्रतिक्विंटल पुकारला गेला, मागील आठवड्याच्या तुलनेत तो 400 ने कमी असल्याने शेतकरी व प्रहार संघटनेच्या वतीने दोन्ही ठिकाणी काहीवेळ लिलाव बंद पाडण्यात आले. उमराणे येथे मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली. अर्ध्या तासानंतर येथे लिलाव पूर्ववत झाले.
मातीमोल भाव मिळत असल्याने येवला तालुक्यातील अंदरसूल येथे आज संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मातीमोल दरामुळे कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यामुळे त्वरित निर्यात खुली करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे झुंजारराव देशमुख, मकरंद सोनवणे, संतोष वाघचौरे, दीपक जगताप, राहुल देशमुख, सुरेश डुकरे, मनोहर सोनवणे, मुकेश देशमुख, सुरेश लासुरे, सतिश सावळे, अक्षय दिघे, कृष्णा सोनवणे, चेतन देशमुख आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
येवला बाजार समितीत सकाळी 96 वाहनांमधील कांदा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. यावेळी किमान 500, कमाल 1632, सरासरी 1400 रुपये क्विंटल भाव पुकारला गेला होता. शेतकऱ्यांनी मनमाड-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार व व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मनमाड बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात 250 रुपयांनी घसरण झाली. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले. निर्यातबंदी उठवावी, किमान निर्यातमूल्य शून्य करावे, या मागण्यांचे निवेदन बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी मालेगाव-मनमाड-नगर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.
चांदवड शहरातील रेणुका मंगल कार्यालयात शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कांदा परिषद घेण्यात आली. यात राज्यभरातून शेतकरी सहभागी झाले होते. केंद्र शासनाने त्वरीत कांद्यावरील निर्यातबंदीसह इतर निर्बंध उठवावे, शेतमाल विक्रीतील सर्व हस्तक्षेप कायमस्वरूपी थांबवावे, या मागण्या करण्यात आल्या, अन्यथा केंद्र सरकारविरोधात एप्रिल महिन्यात आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला. याप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष देवीदास पवार, कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, कुबेर जाधव, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, सीमा नरोडे, सतीष दाणी, शंकर पुरकर, संध्या पगारे उपस्थित होते.
































































