
शनिवारी अंधेरीत पार पडलेल्या ‘मुंबई श्री’ या मानाच्या स्पर्धेचे जेतेपद थोडक्यासाठी हुकल्यानंतर रविवारी सुशील मुरकर याने मनीष आडविलकर्स ‘परळ श्री’ या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मान संपादन करताना शरीरसौष्ठवाच्या मंचावर झोकात पुनरागमन केले. त्याने अपेक्षेप्रमाणे दीपक तांबीटकर, गणेश पेडामकरसारख्या दिग्गजांना मागे टाकत रॉयल एनफिल्डवर स्वार होण्याचा मान मिळविला. बालमित्र जिमचा शुभम कांडू अत्यंत अटीतटीच्या लढतीत फिजिक स्पोर्टस् गटात विजेता ठरला, तर दिव्यांगांच्या गटात डी.एन. फिटनेसचा हितेश चव्हाण अव्वल आला.
अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या मनीष आडविलकर्स ‘परळ श्री’ने गर्दीचा उच्चांकही गाठला. परळच्या कामगार मैदानात पार पडलेल्या मुंबई शहराच्या शरीरसौष्ठवपटूंसाठी आयोजित केलेल्या ‘परळ श्री’ स्पर्धेत मुंगी शिरायलाही जागा नव्हती. ही शरीरसौष्ठव स्पर्धा मुंबई शहराच्या खेळाडूंसाठी मर्यादित असूनही यात 55 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. माजी ‘महाराष्ट्र श्री’ आणि आयोजक मनीष आडविलकरने स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभल्यामुळे बक्षिसांची संख्याही वाढवली. स्पर्धेत सहभागी एकाही खेळाडूला रिकाम्या हाती जाऊ न देण्याचे वचनही मनीषने पाळले. त्यांनी फिजिक स्पोर्टस् प्रकारात 10 ऐवजी 15 खेळाडूंचा सन्मान केला. विजेत्या खेळाडूंना मनीष आडविलकर, दिनेश पुजारी, अन्सार मोहम्मद, स्पार्टनचे सर्वेसर्वा ऋषभ चोक्सी, ‘भारत श्री’ श्याम रहाटे, आशीष साखरकर, किरण पाटील, मासचे समीर दाबीलकर आणि सिनेअभिनेता आकाश ठोसर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. स्पर्धेच्या अभूतपूर्व आयोजनासाठी प्रोबस्ट, मसल गिअरसारख्या न्यूट्रिशन्सचेही मोलाचे सहकार्य लाभले.




























































