पालिका मंडयांमधील कोळणींना मिळणार इको फेंडली कंटेनर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅस्टिकबंदीची जोरदार अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेल्या पालिकेने आपल्या मंडयांमध्येही मासे विक्रीत वापरले जाणारे प्रतिबंधित थर्माकोल बॉक्स हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पालिका मंडयांमधील कोळणींना इको फ्रेंडली कंटेनर देण्यात येणार आहेत. 3741 महिला व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे.

प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली कार्यालये आणि मंडया, मच्छी मार्केट अशी ठिकाणे प्रतिबंधित प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मासे विक्री करणाऱया महिलांना 50, 60 आणि 70 लिटरचे पर्यावरणपूरक मान्यताप्राप्त प्लॅस्टिकचे कंटेनर दिले जाणार आहेत. या महिलांना डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजनेंतर्गत पेड कार्डच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी बाजारातील आईस बॉक्स पुरवठाधारक कंपनीकडून आलेल्या कोटेशननुसार 50 लिटर आईस बॉक्सकरिता 2300 रुपये, 60 लिटर आईस बॉक्ससाठी 3150 रुपये व 70 लिटर आईस बॉक्सकरिता 4550 असे एकूण दहा हजार रुपये दिले जातील. या उपक्रमासाठी वस्तू व सेवा करासहित तीन कोटी 74 लाख 10 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

अशा असणार अटी-शर्ती

  •  या उपक्रमासाठी लाभार्थी हा पालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणारा असावा. शिवाय त्याच्याकडे मासेविक्रेता असल्याचा परवाना असावा.
  • त्याच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड अशा स्वरूपाचा पुरावा असावा.
  • लाभार्थ्यांला शासनाने निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे (आयएसआय मार्क) कोणत्याही बँडचे कंटेनर घ्यावे लागतील.

मासे-मटणासाठी प्लॅस्टिक पिशवी वापरू नका!

मासे-मटण नेण्यासाठी सध्या वापरण्यात येणाऱया प्लॅस्टिकवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनच अशा सिंगल यूज प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मासे-मटण नेण्यासाठी घरातून डबा न्यावा, पानांचा वापर करावा असे आवाहन ‘स्वच्छ भारत अभियाना’चे समन्वयक किरण दिघावकर यांनी पालिकेकडून केले आहे.