
चीनच्या वुहान या शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरामध्ये कहर केला आहे. अनेक देशांमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसची हिंदुस्थानमध्ये एन्ट्री झाली असून दिल्लीनंतर आग्रामध्येही काही रुग्ण आढळून आले आहेत. तसेच तेलंगनामध्येही एक नवा रुग्ण आढळून आला असून तो नुकताच दुबईहून हिंदुस्थानला परतला होता.
Corona virus: नोएडानंतर आग्र्यात कोरोनाची भीती, 6 संशयित रुग्ण आढळले
हिंदुस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसच्या प्रभावापासून वाचण्यासाठी लोकांनी नक्की कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे याबाबत आरोग्य विभागच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, कोरोना व्हायरसची लक्षण सर्दी, ताप यांच्याशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवे हे पाहूया…
1. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छतेबाबत जागरुक व्हा.
2. खोकताना तोंडावर रुमाल किंवा टीशू पेपर ठेवा. त्यानंतर रुमाल स्वच्छ धुवा किंवा टीशू पेपर डस्टबिनमध्ये टाकून द्या.
3. कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छा धुवा. हात कमीत कमी 20 सेकंत स्वच्छ धुवा. त्यानंतर स्वच्छ कपड्याला हात पुसून घ्या.
4. घराबाहेर पडताना चेहऱ्यावर स्वच्छ रुमाल किंवा एन 95 मास्क लावा आणि मगच बाहेर पडा.
5. बाजारातून खरेदी केलेले खाद्यपदार्थ कच्चे खाऊ नका. मांस किंवा हिरव्या भाज्या खाण्यापूर्वी त्यांना स्वच्छ धुवून घ्या.
6. कोरोनाग्रस्त व्यक्ती किंवा अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात राहू नका. कोणत्याही व्यक्तीशी हस्तांदोलन केल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
7. डोळे, नाक आणि चेहऱ्यावर तिनदा-तिनदा हात लावण्याची सवय असेल तर ते टाळा. जरी असे करत असाल तरी हात आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
8. जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि तापस असेल व श्वास घेण्यात अडचण येत असेल तर लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरांना दाखवा आणि उपचार घ्या.
9. डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य पाळा आणि गोळ्या वेळेत घ्या.
(‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे)






























































