कोस्टल रोडचे काम झाले वेगवान! 300 ट्रक-डंपरची संख्या 450 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडचे कामही आता वेगवान झाले आहे. यामध्ये 300 ट्रक-डंपरची संख्या 450 वर नेण्यात आली असून पायलिंग, जॅकप मशिन्सच्या संख्येनुसार मनुष्यबळही वाढवण्यात आले आहे. त्यामुळे कोस्टल रोडच्या कामात डेडलाइन पाळणार असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणारा प्रिंन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 9.98 किमीचा कोस्टल रोड मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी वरदान ठरणार आहे. कोस्टल रोडच्या कामादरम्यान न्यायालयाच्या आदेशामुळे सुमारे सहा महिने बंद असलेले काम 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 8 ते 10 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम करण्यासाठी चीनमधून दीडशे कोटी किमतीची आणि 2200 टन वजनाची देशातील सर्वात मोठी अत्याधुनिक टनेल मशीन आणली जाणार आहे.

या मशीनचा वापर करून 9.98 किमीच्या मार्गात असणाऱया एकूण 3.45 किमीचा बोगदा खोदण्यात येणार आहे. मात्र ‘कोरोना’च्या भीतीमुळे सध्या ही मशीन चीनमधून आणली जाणार नाही. मात्र सध्या वाढवण्यात आलेली मशनरी आणि मनुष्यबळामुळे याचा कोस्टल रोडच्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये पायलिंग, रेक्लमेशन, समुद्राखाली माती परीक्षणच्या कामासाठी मशिन्सच्या संख्या आणि मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. दरम्यान, कोस्टल रोडचे काम आणखी वेगाने होण्यासाठी वाहतूक विभागाने रात्रीप्रमाणे दिवसाच्या वेळीही ट्रक-डंपरच्या वाहतुकीला परवानगी द्यावी यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

ऑक्टोबर 2022 ची डेडलाइन पाळणार

13 हजार कोटींच्या ‘कोस्टल रोड’चे काम 13 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू करण्यात आले. मात्र या प्रकल्पामुळे पर्याकरणाला हानी पोहोचत असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने सुमारे सहा महिने स्थगितीमुळे काम थांबले होते. मात्र सध्या कोस्टल रोडच्या कामासाठी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ वाढवण्यात आल्याने कामाची ऑक्टोबर 2022ची डेडलाइन पाळणार असा विश्वासही पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोस्टल रोडचे काम वेगाने करण्यासाठी आवश्यक मशनरीसह त्यासाठी लागणारे मनुष्यबळही वाढवण्यात आले आहे. आतापर्यंत आठ टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास वाटतो. – विजय निघोट, मुख्य अभियंता, कोस्टल रोड