
चौदा विविध मार्गांद्वारे मुंबई महानगर प्रदेशात उत्तम कनेक्टीव्हिटी देण्याचा विडा उचललेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो रेल्वेच्या तिकिटाची ऑनलाइन बुकिंग करण्याची सोयही उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विशेष मोबाईल ऍप बनवले जाणार आहे. प्रवाशांना मेट्रोच्या सर्व मार्गांची इत्थंभूत माहिती मिळावी. मेट्रोच्या गाडय़ांचे वेळापत्रक कळावे. तिकिटाचे बुकिंग करता यावे तसेच मासिक पास विकत घेणे सुलभ व्हावे म्हणून हे मोबाईल ऍप उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या ऍपवर मेट्रोचा नकाशा आणि मेट्रोचे जाळे कुठवर पसरले आहे याची माहितीही मिळणार आहे. सध्या हे काम प्राथमिक स्तरावर असून सविस्तर चर्चा करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे असे एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी सांगितले.


































































