मालवणात ट्रॉलर पळाला ‘डिंगी’ मत्स्य विभागाच्या हातात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण-वेंगुर्ले किनारपट्टी दरम्यान वीस वाव खोल समुद्रात अवैधरीत्या एलईडी पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणारा गोवा येथील एलईडी ट्रॉलर मत्स्य व्यवसायच्या गस्तीनौकेने बुधवारी मध्यरात्री तीन वाजता पकडला. मात्र मालवण बंदरात आणत असताना ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे कारण पुढे करून मागे राहिलेला ट्रॉलर पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, कारवाई वेळी मत्स्य व्यवसायच्या पथकाने ट्रॉलरसोबत असलेली डिंगी (छोटी होडी), एलईडीचे बल्ब, जनरेटर, अन्य साहित्य व आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तर ट्रॉलरवरील खलाशी, तांडेल यांच्याकडूनही जबाब घेण्यात आला आहे. एलईडी ट्रॉलरवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसायचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परप्रांतीय हायस्पीड, एलईडी पर्ससीनधारक ट्रॉलर्स व्यावसायिकांकडून मासळीची लूट सुरू आहे. कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेवरून परवाना अधिकारी मुरारी भालेकर, पोलीस कर्मचारी संदीप सरकुंडे, तांडेल नारायण हरचरीकर, प्रभाकर हरचरीकर यांच्या पथकामार्फत बुधवारी रात्री समुद्रात गस्त सुरू होती. मध्यरात्री त्यांनी एका एलईडी पर्ससीननेट ट्रॉलरचा पाठलाग केला. मात्र तो ट्रॉलर पळून जाण्यात यशस्वी झाला. याच दरम्यान वेंगुर्ले समुद्रातील वीस वावात एलईडी पर्ससीन ट्रॉलर तीव्र प्रकाशझोतात अवैधरीत्या मासेमारी करत असल्याचे दिसून आल्याने शीतल गस्तीनौकेवरील पथकाने हा ट्रॉलर पकडला.

ट्रॉलरची तपासणी केली असता ट्रॉलरचे नाव गौरी आयएनडी जीए 01 एमएम 2943 असून तो बारदेस गोवा येथील सोनाली भोसले यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. या ट्रॉलरवर 2 तांडेल खलाशी असे 27 जण होते. यातील बारा जणांना गस्ती पथकाने आपल्या नौकेत घेतले तसेच ट्रॉलरसोबत असलेली छोटी नौका, एलईडी बल्ब, जनरेटर, आवश्यक कागदपत्रे अन्य साहित्य जप्त केले. पकडलेला ट्रॉलर गस्ती नौके पाठोपाठ मालवण बंदरात आणण्यासाठी सुरू करण्यात आला. मात्र काही अंतरावर आल्यानंतर ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे सांगत आतील खलाशी तांडेल यांनी थेट मशीन खोलल्या. तो ट्रॉलर पुढे येऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. समुद्रात वाराही जोरदार असल्याने त्या ट्रॉलवर असलेले गस्ती पथकातील सदस्य गस्ती नौकेत आले. गस्तीनौकेने छोट्या नौकेसह, खलाशी, तांडेल व जप्त केलेले साहित्य मालवण बंदरात आणले.

ताब्यात घेतलेल्या तांडेल व 11 खलाशी यापैकी तांडेल यांच्याकडून मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांनी जबाब नोंदवून घेत गुरुवारी सकाळी त्यांना सोडून दिले. ट्रॉलरवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती परवाना अधिकारी भालेकर यांनी दिली.

समुद्रात एलईडी मासेमारीस पूर्णतः बंदी असताना राज्याच्या सागरी हद्दीबाहेरही मोठ्या प्रमाणात एलईडीची मासेमारी सुरू असल्याचे कारवाई दरम्यान दिसून आल्याचे श्री. भालेकर यांनी सांगितले. यामुळे केंद्राची शासकीय यंत्रणा एलईडीची अवैध मासेमारी रोखण्यास अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुन्हे दाखल व्हावेत

मत्स्य विभाग गस्ती पथकाने कारवाई करून ट्रॉलर बंदरात आणत असताना तो सुरू होता. त्यानंतर अचानक ट्रॉलरमध्ये बिघाड झाल्याचे सांगून तेथून पळ काढण्याची नवी शक्कल लढवत ट्रॉलरव्यावसायिकाने शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित ट्रॉलर मालकाविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी केली आहे.