नीरव मोदीच्या मुंबईतील संपत्तीचा लिलाव,करवसुलीसाठी मुंबई महापालिकेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या मुंबईतील चारपैकी तीन संपत्ती मुंबई महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. तब्बल 9.5 कोटी रुपयांचा थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पालिकेने ही कारवाई केली आहे. प्रकर्तन निदेशालय (ईडी) या संपत्तीची लिलाव प्रक्रिया करीत असून महापालिकेने ईडीला पत्र लिहून मालमत्ता कराचा भरणा लवकरात लवकर करण्यास म्हटले आहे. मुंबईतील लोअर परळ येथील पेनिनसुला बिझनेस पार्कमध्ये नीरव मोदीची व्यावसायिक संपत्ती आहे. तर अन्य दोन व्यावसायिक संपत्ती कुर्ला येथील कोहिनूर सिटी तर निवासी संपत्ती कालिना येथे आहे.

किमती वस्तूंचा लिलाव सुरू

नीरक मोदीकडील किमती वस्तूंचा ऑफलाइन आणि ऑनलाइन लिलाव गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झाला. या वस्तूंध्ये हिरेजडित महागडी घडय़ाळे, कार, अन्य वैशिष्टय़पूर्ण कलाकृतींचा समावेश आहे. मोदीवर पंजाब नॅशनल बँकेशी 14 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सध्या नीरव लंडनमधील कारागृहात आहे.गेल्यावर्षी सॅफरन आर्टने मोदीच्या मालकीच्या कलाकृतींचा लिलाव केला होता.लिलावाअंती 55 कोटी रुपये जमा झाले. लिलावातील सामानामध्ये अमृता शेरगिल यांचे 1935मधील पेंटिंग, एम.एम.हुसैन यांनी काढलेले तैलचित्र, मनजीत बावा यांचे कृष्ण पेंटिंग यांचा समावेश आहे.

चालू लिलावात या वस्तू

चालू लिलावात राजा रवी वर्मा यांचे चित्र आहे. पाटेक फिलिपचे नॉटिकल ब्रॅण्डचे सोने आणि हिरेजडित घडय़ाळदेखील असून लक्झरी कारमध्ये रोल्स रॉयस घोस्ट या कारमधून 95 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच ब्रॅण्डेड हॅण्डबॅगचाही लिलाव होणार आहे.