‘शबरीमाला’नंतरच ‘सीएए’वर सुनावणी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

शबरीमालासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच नागरिकता कायद्यावरील (सीएए) सुनावणी सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च् न्यायालयाने गुरुवारी दिले. मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीएए प्रकरणातील सुनावणी तत्काळ घेण्याची मागणी केल्यानंतर कोर्टाने हे निर्देश दिले.

याप्रकरणी अद्याप केंद्र सरकारकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केंद्राकडून लवकरच उत्तर येईल, असे स्पष्ट केले. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या नऊसदस्यीय खंडपीठासमोर शबरीमाला मंदिर आणि काही मशिदींमधील महिलांचा प्रवेश तसेच दाऊदी बोहरा समाजातील महिलांच्या खतना या प्रथेविरोधात कोर्टात प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निकाल लागल्यानंतरच सीएएची सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

सीएएविरोधी याचिकेवर सुनावणीस न्यायालय तयार

सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) आव्हान देणाऱया सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. याचिकेची दखल घेत शुक्रवारी सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस बजावली.

सीएएविरोधात आतापर्यंत 160 हून अधिक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. न्यायालयाने त्या याचिकांसोबत गोखले यांची याचिका जोडली आहे. सर्व याचिकांवर या महिन्यातच सुनावणी होणार आहे. न्यायालयाने गेल्या वर्षी 18 डिसेंबरला झालेल्या सुनावणीवेळी सीएएची संवैधानिक वैधता तपासण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी सीएएच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास नकार दिला होता.