
>> मलिका अमरशेख
महिलांचे प्रश्न शहरात आणि ग्रामीण भागात बरेच वेगळे असतात, हे मान्य; पण मला ग्रामीण भागातल्या स्त्रियांचं नक्कीच वेगळं असावं वा असतंच. प्रतिकूल परिस्थितीशी कायमचाच झगडा. रोज नवे प्रश्न…काही मातीशी निगडीत तर काही मताशी निगडीत, परंतु तरीही स्वतःच्या कष्टाकर प्रचंड विश्वास. या प्रश्नांची हरवलेली उत्तरं शोधता शोधता तिला तिचं अस्तित्व आपोआप गवसतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच ती आता सक्षमतेकडे कळू लागली आहे. स्वतःच्या गुणांची पारख तिला अधिक स्पष्टतेनं जमू लागली आहे.
‘‘हां न्ना, त्येच उच है का..? त्येच झाडाला फाशी लावून घेतलीन् मालकानं – हां नं वावर ह्ये समदं आपलंच है, पन कंदी पाऊस येतुय कधी अजाबात नाय. तं घेतलनं कर्ज मालकानं… गेल्या वरसाला तं दोनही बैलबी वोपली… गाया गेल्या… लय लय नुकसानी… करजासाठी ब्यँकेची लोक येऊन बसाची घरला- लय घोर… अवो, लेक लग्नाची घरात तरी ह्यो बाबा निस्ता करज कसं फिटल? कसं फिटल? याच इचार का आचार म्हना रात सारी झोप नाही. थानंभूक हरपली… मस चार चार भाकऱया खानारा पन एक कोर खाईना…’’
काय म्हंता? मपल्याला कसं वाट्टं? लय शेरातली लोक तुमी? घरचा मालक आस बघा हाय खाऊन शेतात जाऊन फाशी लावल्यावर घरच्या लक्ष्मीला कसं वाटलं इचारताय… तुमास्नी काय काळीज असलं नसलं पन् सांगा म्याबी आसं इचार केला तं या कच्च्याबच्च्यांना कोण संबाळल? गडी मानूस काय…लगीच हाय खातु… पन तस्सं आमास्नी करून चालनार का?
मालकानं नाय इचार केला आमचा – की ते सुटलं – पन ब्यांकवालं – गावगुंड – सावकार टिकार – गणगोत – समदे आता लांडग्यागत येत्याल माजं लचकं तोडाया – पन मी शाप सांगत्येय – मी मरनार न्हाय म्हंजे न्हाय. तुमचं सरकार असूद्या की पंचायत, की गावठान – जव्हर दम हाय तव्हर ही तान्हाबाय हितं राहूनशान समद्यास्नी पघून घिल – माज्या पोरानला शिकवील ही काळी माय- अज्जून घट हायेत हे हात, पघा, बयलं ओपली म्हनून काय झालं मी माजा पोर आमी दोघंबी वढू नांगरट करू.
काय म्हंता, पानी आटलं डोळय़ातलं.
डोळय़ातलं पानी रगतात आलं… हातात आलं… ज्ये ते येतं इचारतं, ज्ये ते येतं इचारतं, कुटं फाशी लावली? कसं जालं? मदत कोनच करना. सांगून सांगून पानी आटलं पघा डोळय़ाचं.
गडी मानसाचं काय अडकला जीव घेतली फाशी पन मी बी असाच इचार केला तर या गावातली एकबी बाई जित्ती नाय राहणार. समदी पोरं बेवारस व्हत्याल. आई नाय बाप नाय न् कोण संबाळतार त्येस्नी?
गडी मानसं लय दिस्तात जोमदार पन कायबी दम नहीं है त्येंच्या जिगरमदी. अवो, लाथ मारीन तिथं पानी काढनं असं एकबी म्हणनाय. आमी बायाच त्यापक्षी जिगरबाज हौवं. आमी नाय मंजे नाय मरनार. आता गावात बी शेरातबी पोरीचं पोट पाडत्यात. यान्ला बाया नकुत. आरं पर हेच कंच्या शेतातनं उगवलेत? का आकाशातून पडलेत पावसागत टपटपा? घर संबाळायला – वंस वाढाला यांन्ला बायकाच लागतात. मग पोरी जलमाला आल्या तं कश्याला वाईट वाट्टंय? हां न्ना भाव, आता जमाना वाईट आलाय. पन तो पह्यल्यानंपनन वायटच व्हता बायांसाठी. आता तुमी फोटू शूटू काढता. पेपरला, टीवीला दाखवतान. सगळय़ान्ला समजत ना? आधी हे काय बी नव्हतं. तरीबी पघा द्रुपदीची साडी फेडलीच ना पाच नौरे असताना पण? काय राह्यलं? तं हे कायमच है पैल्यापास्नं, पन तरीपन तगलो ना आमी बाया?-
नाय आमी फाशी घेतली. नाय आमी बळजोरी केली म्हनून बळजोरी केल्याचा खात्मा केला ना कुऱहाडीनं खचाखचा तोडलं त्येन्ला. पन मंजे असं पन नाय की आमी आसंच ऱहाऊ. जव्हर समदं साजरं हाय तव्हर आमी गायी – नाय तं वाघिणी पन होऊ. शेरात मस बळजोरी करून बायांन्ला मारत्यात त्यांची पिशवी बाहेर काढूस्तवर हैवान सत्यानास करत्यात तरीबी जितं राह्यत्यात…
यकांद दिवस असा यील की हरेक बाई कोयता घिउैनच फिरलं – जो कुनी बळजोरी करायचा इचार करील त्याचं सामानच कांडक्यागत तोडील- येतुय म्हंता? या – दुसकाळच दुसकाळ हाये पन् भाकरी गूळपानी घिऊन जावा की.
न्हाय-?
बरं-
फोटू काढूनशान काय बी होत नाही पघा-
जाऊंद्या- मला बी मस काम हैत. नांगरट करायची है- बयलं वोपली ना
मी न माजं पोरगं मस हिम्मतवाल है – आबाळाचा राजा मानसापरास कनवाळू हाय- कधी ना कधी बरसलच. न् पघा मंग जिथं मालक जीभ हासडून गेला तिथ्थं आमी आसा हिर्वा जीव पांघरू की जसं मालकान्ला वाटावा पुन्यांदा जल्म घ्यावा इथल्या हिर्व्या पिकामंदी-टप्पूर दाण्यामंदी-!





























































