
अनेकांना घरात कुत्रे-मांजरी पाळण्याची आवड असते. त्या प्राण्यांना लळा लावून त्यांची पोटच्या मुलाप्रमाणे जोपासनाही केली जाते. पण, या जोपासनेसाठी एका व्यावसायिकाने चक्क वीज चोरी केल्याची घटना नेरुळ येथे उघडकीस आली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, नेरुळ येथील सेक्टर 1 मधल्या ट्वीनलँड टॉवर येथे वीज चोरी होत असल्याची खबर वीज कंपनीला मिळाली होती. त्यानुसार वीज कंपनीचे काही अधिकारी या इमारतीत छापा टाकायला गेले. त्यांनी वीजेचे मीटर उघडून तपासले. त्यात सर्वकाही व्यवस्थित असल्याचं त्यांना आढळलं. त्यामुळे ही खबर चुकीची असावी असा त्यांचा समज झाला. तरीही पुन्हा शंका राहू नये म्हणून त्यांनी मीटर पुन्हा तपासले. तेव्हा त्यांना मिळालेली खबर ही खरी असावी याची खात्री पटली.
या मीटरला लागून एक भिंतीत लपवलेली वायर थेट इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी पाचव्या मजल्यावर नीट तपासणी केल्यानंतर त्यांना जे आढळलं ते काहीसं धक्कादायक होतं. या मजल्यावर दोन 2 बीएचके क्षेत्रफळाचे फ्लॅट एकत्र केले होते. त्यात एका व्यावसायिकाचं कुटुंब आणि त्याचे तीन कुत्रे राहत असल्याचं त्यांना आढळलं. या जागेत एका ठिकाणी चोवीस तास वातानुकूलित यंत्रणा ठेवण्यात आली होती. आणि या यंत्रणेसाठीच हा व्यावसायिक वीज चोरी करत असावा, अशी शंका पोलिसांना आली.
त्यानुसार त्यांनी व्यावसायिकाकडे याबाबत कसून चौकशी केली. तेव्हा त्याने खरा प्रकार सांगितला. त्याच्याकडे गोल्डन रिट्रिव्हर, बीगल आणि लॅब्रेडोर अशा तीन जातींचे तीन कुत्रे आहेत. या तिन्ही प्रजाती शीतकंटिबंधीय प्रदेशातल्या आहेत. त्यामुळे या कुत्र्यांना मुंबई आणि परिसरातील उष्ण आणि दमट वातावरण सहन होत नाही. या कुत्र्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून चोवीस तास एसी सुरू ठेवण्यात आला होता. आणि त्यासाठी लागणारी वीज चोरून वापरत असल्याची कबुली या व्यावसायिकाने दिली. त्यानुसार वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याने चोरून वापरलेल्या विजेचा हिशोब केला आणि त्याला तब्बल सात लाख 22 हजारांचा दंडही भरण्यास सांगितलं.
या व्यावसायिकाने यापूर्वी यासारखा कोणताही गुन्हा केला नव्हता. तसंच दंड सांगितल्यानंतर त्याने लगेचच तो भरण्याची तयारी दर्शवली. यामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, असे कृत्य पुन्हा आढळल्यास हे प्रकरण पोलिसांकडे वर्ग करण्यात येईल, असा इशाराही व्यावसायिकाला देण्यात आला.



























































