
इंडो-चायना बॉर्डरवरील तवांग सेक्टरमध्ये शहीद झालेले मेजर प्रसाद महाडिक यांच्या वीरपत्नी गौरी महाडिक या ‘लेफ्टनंट’ झाल्या आहेत. महिला दिनाच्या पूर्व संध्येला ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्या लवकर कामावर रुजू होतील.
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी तंबूला भीषण आग लागून त्यात विरारचे सुपुत्र मेजर प्रसाद महाडिक यांना 30 डिसेंबर 2017 रोजी वीरमरण आले. विरारमधील बोळींज गावात राहणाऱ्या महाडिक कुटुंबीयांस मोठा हादरा बसला. पत्नी गौरी हिच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. तरीही या दुःखावर मात करीत गौरी यांनी पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट लष्करामध्येच दाखल होण्याचा निर्णय घेतला.
गौरी महाडिक या वकील असून एका नामांकित कंपनीमध्ये मोठय़ा पदावर काम करीत होत्या, मात्र लष्करात भरती होण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी ही नोकरी सोडली आणि लष्करी भरतीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची ऑनलाइन परीक्षा प्रथम क्रमांक मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर एप्रिलमध्ये लष्करी अधिकारी प्रशिक्षण केंद्रात दाखल झाल्या. या केंद्रामधून 49 आठवडे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर थेट लेफ्टनंट पदावर गौरी महाडिक यांची नियुक्ती केली जात आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.























































