
>> प्रभाकर भावे
नोकरी सांभाळून हौस म्हणून जोपासलेल्या कलेने आपल्या रंगांच्या वलयात मलाच रंगवून टाकले.
रंगभूषा हा त्या नटावर/नटीवर केलेला चांगला मानसोपचार असतो. भूमिकेत शिरायला रंगभूषा मदत करते. 60 वर्षे या व्यवसायात आहे. माझा हा व्यवसाय नाही. मी हौस म्हणून या क्षेत्रात आलो. 35 वर्षे किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी करून हा छंद जोपासला. ही सुरुवात शाळेत असल्यापासून झाली. माझे वडील आणि त्यांचे मित्र रंगभूषा करीत असत. ती पाहून मला जिज्ञासा उत्पन्न झाली.
प्राथमिक ज्ञान माझे वडील नी. श्री. भावे आणि त्यांचे मित्र आण्णा भिडे या छायाचित्रकारांकडून घेतली. आज दोघेही हयात नाहीत. नंतर नोकरीनिमित्त पुण्यात आल्यावर मला निवृत्ती दळवी भेटले. त्यांच्याकडून मी क्रेपहेअरचे काम शिकलो. पुढे कै. दादा परांजपे जे प्रभात फिल्म कंपनीचे रंगभूषाकार होते आणि कै. नाना जोगळेकर यांचे मला खूप मार्गदर्शन झाले. त्यामुळे मी वेगळे प्रशिक्षण घेतले नाही.संगीत नाटक अकादमीपासून ते अनेक शिबिरांतून जवळजवळ 250 शिबिरांतून मार्गदर्शन केले आहे. हौशी नाटय़ संस्थांसाठी काम केले. पुण्यातील सर्वात महत्त्वाची पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेची सलग 50 वर्षे रंगभूषा केली. तसेच ‘फिरोदिया करंडक’साठी गेली 35 वर्षे रंगभूषा करीत आहे. ‘इप्टा’ या संस्थेने माझ्यावर डॉक्युमेंटरी केली.
मी ज्या काळात रंगभूषेला सुरुवात केली त्यावेळी साधनांची कमतरता होती आणि कलावंत माझ्यासमोर वेगवेगळी आव्हाने निर्माण करीत होते. त्यामुळे मला कलाकारांनीच रंगभूषाकार म्हणून घडविले. बाबा वर्दम यांच्याकडून नेटच्या दाढय़ा, मिशा आणि विग यांचे शिक्षण घेतले. त्यामुळे मी आज जिज्ञासूंना हे मार्गदर्शन देऊ शकतो. इतर रंगभूषाकारांकडून मला हेवेदावे करू नयेत, आपण फार मोठे आहोत अशी समजूत करून न घेणे हे त्यांच्या वागणुकीवरून शिकायला मिळाले. अपवाद फक्त कृष्णा बोरकरांचा. आम्ही दोघांनी एकमेकांचे गुरू-शिष्यत्व स्वीकारले.
या कलेने प्रतिष्ठा दिली. अनेक मोठमोठय़ा लोकांचा सहवास मिळाला. माझ्या पहिल्या मुखवटय़ांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन विजयाताई मेहता यांनी केले. अशी देशभरात 16 प्रदर्शने झाली. ‘सुरभी’ या दूरदर्शन मालिकेत मुखवटय़ांचे प्रसारण रेणुका शहाणे व सिद्धार्थ काक यांच्यामुळे झाले. माझ्या ‘रंगभूषा’ या पुस्तकाचे प्रकाशन कै.पु.ल.देशपांडे यांच्या हस्ते झाले. आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखती झाल्या. या विषयावर पुष्कळ स्फुट लेखन झाले. माझे वडील आणि दादा परांजपे यांच्याकडून रंग कसा लावावा हे कळले, पण तो किती लावावा हे मात्र कै. राजा नातू आणि कै. भालबा केळकर यांच्याकडून शिकायला मिळाले. प्रॉस्थेटिक मेकअप रबराचे अनेक पिसेस तयार करून हा मेकअप मी 30 वर्षांपासून करत आहे. कमीत कमी रंग लावून आवश्यक तेवढय़ाच रेघा मारून जास्त परिणाम कसा साधायचा हे माझे वैशिष्टय़ आहे.



























































