
विधान भवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठत पुतळा आणि त्याच्या कठडय़ाची उंचीबाबत निर्णय घेण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील सदस्य या समितीचे सदस्य असतील.
विधान मंडळ प्रांगणातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांबाबतचा मुद्दा काँग्रेस सदस्य रामहरी रूपनवर यांनी उपस्थित केला होता. विधान भवन इमारतीच्या सभोवती राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत. या पूर्णाकृती पुतळे उंच कठडय़ावर आहेत. त्यांची उंचीही जास्त आहे. शिवाय या सर्व पुतळ्यांची नजर बाहेरच्या दिशेला आहे. पुतळ्यांची उंची आणि दिशेमागे काय भूमिका होती याची आम्हाला कल्पना नाही, मात्र या सर्व पुतळ्यात शिवरायांचा पुतळा मात्र वेगळा आहे. त्याची उंची वाढवायला हवी अशी मागणी रूपनवर यांनी केली. शिवाजी महाराजांचा पुतळा जास्त उंचावर नाही. त्यामुळे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्याभोवती सगळे जमल्यावर तो दिसत नाही याकडे रूपनवर यांनी लक्ष वेधले.
यावर विधान भवनातील शिवरायांची सिंहासनाधिष्ठत मूर्ती अत्यंत सुबक आहे, परंतु कठडा आणि मूर्तीच्या उंचीबाबत निर्णय घ्यायला हवा. त्यासाठी सभापतींच्या अध्यक्षतेखालील समितीची घोषणा मी करत आहे. दोन्ही सभागृहांतील इच्छुक सदस्य या समितीत येऊ शकतात. पुतळ्यांबाबत ही समिती निर्णय घेईल, असे सभापती नाईक-निंबाळकर म्हणाले.





















































