कोरोनाचा श्री विठ्ठल मंदिर समितीने घेतला धसका, देवाचे पदस्पर्श दर्शन बंद?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विशेष काळजी घेतली आहे. वर्दळीच्या सर्वच ठिकाणी कडक निर्बंध घातल्याने, दक्षता म्हणून श्री विठ्ठल-रखुमाईचे पदस्पर्श दर्शन बंद करुन केवळ मुखदर्शन सुरु ठेवावे का? या निर्णयाप्रत मंदिर व्यवस्थापन पोहचले आहे. याबाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार असल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे उपाध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘दै. सामना’शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. आतापर्यंत 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. बाधित व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर याची लागण होते. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात देवाच्या पायाला हात लावून आणि डोके टेकून दर्शन घेण्याची पद्धत आहे. दररोज हजारो भाविक देवाच्या पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेत असतात आणि आलेल्या भाविकांत देशविदेशातील भक्तांचा समावेश असतो. त्यामुळे दक्षता म्हणून देवाचे पदस्पर्श दर्शन व्यवस्था काही दिवस बंद ठेवून फक्त मुखदर्शन दिले जावे का याबाबत मंदिर समितीच्या व्यवस्थापनात चर्चा सुरु झाली आहे.

pandharpur

दरम्यान, मंदिर समितीने कर्मचाऱ्यांना मास्क दिले असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनीटायझरचे दोन थेंब टाकून दक्षता घेतली जात आहे. येत्या दोन दिवसात समितीची तातडीची बैठक बोलावून यावर निर्णय घेऊ असे हभप औसेकर महाराज यांनी सांगितले.