
>> समीर गायकवाड
साहिरनी लिहिलेल्या प्रेमगीतात त्यांचे व्यक्तिगत आयुष्य डोकावते. अमृता प्रीतमजींसोबतचं त्यांचं नातं याच वळणातून आपल्यासमोर येतं. नुकतीच साहिर लुधियानवींच्या जन्मशताब्दी वर्षास सुरूवात झाली आहे. त्यानिमित्त हा काव्यानुभव.
साहिर लुधियानवी व्यक्ती म्हणून ग्रेट होतेच, पण त्यांच्या गीतातली विविधता बहुपेडी असली तरी वास्तवाशी फारकत करणारी कधीच नव्हती. ‘प्यासा’मध्ये असलेल्या ‘जिन्हे नाझ है हिंद पर’ या गीताचा आशय राष्ट्रगीतास आव्हान देणारा असला तरीही त्याने काळजात घर केलेलं. हे गीत वेश्येच्या कोठय़ावर आधारित प्रसंगामधलं होतं. या गाण्याच्या लोकेशनसाठी आयडियल स्पॉटच्या शोधात गुरुदत्त आपल्या मित्रासह एका कोठय़ावर गेले आणि तिथले दृश्य पाहताच सर्द झाले. कोठय़ावर नाचणारी तरुणी जवळपास सात महिन्यांची गर्भवती होती. तरीदेखील लोक तिचा नाच पाहत होते. ती अगतिक होऊन नाचत होती आणि लोक तिच्यावर दौलतजादा करत होते. व्यथित झालेले गुरुदत्त आपल्या मित्राला निर्वाणीचे चार शब्द सुनावून तिथून उठून गेले. जाताना त्यांच्या हातातली नोटांची बडंलं त्यांनी तिथेच ठेवली. ‘प्यासा’ने इतिहास घडवला. या सिनेमानंतरच्या दोन दशकांनंतर मी जन्मलो असलो तरीही हा सिनेमा अन् त्यातलं हे भावोत्कट गाणे जवळचे वाटते. अगदी काल परवाचे वाटते याचे कारण साहिरच्या टोकदार शब्दरचनेत दडले आहे. रेड लाईट एरियात राहणाऱया स्त्रियांचा दर्द त्यात ओतप्रोत भरला होता.
‘वक्त’मधील ‘आगे भी जाने ना तू, पिछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है’ हे गीत या चित्रपटाचा परमोच्च उत्कटबिंदू आहे! संथ लयीतील डाऊनटोन सुरातलं हे गाणं खूप प्रेक्षणीयही आहे. भूतकाळाला निरर्थक समजून भविष्याला केवळ ओढ ठरवून फक्त वर्तमानातच जगण्याचा संदेश या गीतातून मिळतो. वर्तमानही अगदी क्षणांच्याच मापाने मोजलं पाहिजे. कालचक्र नाकारून फक्त वर्तमानावरच विश्वास ठेवणारा आणि वर्तमानाला फक्त क्षणापुरते मर्यादित करून नियतीकडे बघण्याचा, तिचे समर्थन करण्याचा एक नवा दृष्टिकोन साहिर देतात. ‘वक्त’ आता आऊटडेटेड वाटत असला तरी ‘आगे भी…’ ताजेतवाने वाटते कारण ते सदैव वर्तमानास जागणारे आहे.
साहिरनी लिहिलेल्या प्रेमगीतात त्यांचे व्यक्तिगत आयुष्य डोकावते. अमृता प्रीतमजींच्या आयुष्यात काटेरी नागमोडी वळणे येत होती आणि तशात हमसफर म्हणून साहिरजींचे आगमन झालं. अमृता लाहोरला होत्या तेव्हा साहिर त्यांना भेटायला त्यांच्या घरी यायचे. घरी आले की, या दोघांच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. गप्पा मारता मारता साहीर सिगारेटी फस्त करत राहायचे. अमृता मात्र साहिरनी सोडलेल्या धुम्रवलयात आपली स्वप्ने पाहायच्या. साहिर तिथून गेल्यावर त्यांनी पिऊन टाकलेल्या सिगारेटची थोटके त्या गोळा करायच्या अन् हळूहळू त्यांना पुन्हा शिलगावून ओठी लावायच्या! त्या आपल्या ओठांवर साहिरना अनुभवायच्या ! या नादात अमृतांना सिगारेटचे व्यसन जडले. अमृता साहिरला कधीच विसरू शकल्या नाहीत. ‘मेरे शायर, मेरा महबूब, मेरा खुदा और मेरे देवता’ अशी त्यांची साहिरबद्दलची व्याख्या होती.
पुढे साहिर मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावायला आले आणि मग इथलेच झाले. चित्रपट गीतकार आणि शायर म्हणून त्यांनी अमाप ख्याती मिळवली. साहिर मुंबईला गेल्यावर या दोघांतलं नातं तसंच उत्कट राहिलं अन् त्याला पत्रांचा आधार मिळत गेला. दोघेही रोज एकमेकाला पत्रं लिहीत. काही काळ सुधा मल्होत्राच्या रूपाने त्यांच्यात दरी निर्माण करता येते का याचा प्रयत्न नियतीने करून पहिला, पण तिलादेखील अपयश आले. त्यांचे भावनिक नाते एकमेकांशी न बोलताही अबाधित राहिले. चित्रपटसृष्टीच्या या मायावी दुनियेत अनेक स्त्रिया साहीरच्या आयुष्यात आल्या; परंतु त्यापैकी कुणाशीही ते संसार थाटू शकले नाहीत. मात्र प्रेमप्रकरणांतील या कटू-गोड अनुभवांनी त्यांचं आयुष्य वेगळ्या अर्थानं समृद्धही केलं. त्यांच्यातला रोमॅण्टिक प्रियकर त्याच्या गाण्यांतून, शायरीतून अलवारपणे व्यक्त झालेला दिसतो, तो या उत्कट अन् तरल जीवनानुभूतींमुळेच! ज्या प्रमाणे अमृतांनी साहिरची सिगारेटची थोटके जतन करून ठेवली होती तशाच स्मृती साहिरनीदेखील एका चहाच्या कपात जपून ठेवल्या होत्या. अमृतांनी आपल्या ओठाला लावलेला चहाचा कप साहिरनी कित्येक वर्षं न धुता तसाच आपल्याजवळ जपून ठेवला होता!! साहिरनी सुनील दत्तच्या ‘गुमराह’साठी लिहिलेले गाणं जणू त्यांच्या प्रेमासाठीच होतं – ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों…’
साहिरबद्दल लिहिताना अमृतांनी एके ठिकाणी म्हटलंय- ‘साहिर आणि माझ्यात निःशब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱया दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही निःशब्दच होतं आणि अखेरपर्यंत ते तसंच निःशब्द राहिलं.’ साहिरनीही ‘शादी का जोडा’ कधी अंगावर चढवला नाही. त्यांच्यातला शायर म्हणूनच वेदनांत जास्त रमला, विरहाची नवी भाषा बोलू लागला अन् प्रेमाचे स्वतः अनुभवलेलं जग काव्यात मांडत राहिला.
‘मैं पल दो पल का शायर हूँ,…’ , ‘ ‘ऐ मेरी जोहराजबी …’ ‘मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मै बता दूं…’, ‘आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू …’, ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है …’, ‘मन रे तू काहे ना धीर धरे…’, ‘संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे…’, ‘ये दिल तुम बिन कही लगता नही, हम क्या करे …’, ‘तोरा मन दर्पण कहेलाये …’, ‘नीले गगन के तले धरती का प्यार …’, ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएमें उडाता चला गया …’
साहिर लुधियानवी यांनी विविध चित्रपटांसाठी लिहिलेल्या या सर्व गाण्यांचा अर्थ आपल्याला तेव्हा अधिक प्रकर्षाने कळतो जेव्हा आपल्याला त्यांचं प्रेम गवसतं. साहिर खऱया अर्थाने ‘जिन्हे नाझ है हिंद पर…’ अशा वर्गवारीतले उच्च प्रतिभेचे देणे लाभलेले कवी होते.





























































