कोरोनाच्या धास्तीने रेल्वेनंतर आता एसटी, बेस्ट आणि मोनोची सफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या धास्तीने रेल्वेने उपनगरीय लोकलच्या डब्यांचे हॅण्डल तसेच सीटस् आदींची फिनाईलने साफसफाई सुरू केल्यानंतर आता मोनो तसेच बेस्ट आणि एसटी महामंडळानेही आपल्या गाडय़ांच्या आसनांना तसेच हॅण्डल तसेच प्रवाशांचा वारंवार स्पर्श होणाऱया जागांवर फिनाईलचा स्प्रे फवारून त्यांची साफसफाई सुरू केली आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे संशयग्रस्त रुग्ण सापडल्याने एकीकडे 31 मार्चपर्यंत सर्व शाळा-मॉलना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपनगरीय लोकल ट्रेन तसेच लांब पल्ल्यांच्या ट्रेनवर स्वच्छतेसाठी फिनाईलने फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे लाइफ लाइन लोकल ट्रेनच्या नंतर मुंबईकरांचा भार वाहणारी दुसरी लाइफ लाइन बेस्टनेदेखील काळजी घेतली आहे. बेस्टच्या सर्व गाडय़ांना फिनाईलने साफ करून पुसून घेतले जात आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटीतही कटाक्षाने स्वच्छता पाळली जात आहे. कंडक्टरांना हॅण्ड सॅनिटायझर दिले असून ते प्रवाशांना उपलब्ध करण्यात येत आहेत.

पडदे आणि ब्लँकेट बदलण्याचे आदेश
मोनोरेलच्या स्थानकावरील प्रवाशांचा स्पर्श होणारे जिन्यांचे स्टीलचे रेलिंग तसेच तिकीट खिडक्या, आसने आणि हॅण्डलना फिनाईलने स्प्रे मारून पुसून घेतले जात आहे. रेल्वेने लांबपल्ल्यांच्या गाडय़ांमधील ब्लँकेट बदलण्याचे आदेश दिले आहेत.तसेच एसी कोचेसमधील पडदेही काढून टाकण्याचे तसेच नवे धुतलेले पडदे तसेच लिननच्या चादरी पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिवसभर संबंधित अधिकाऱयांच्या बैठका घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांशी चर्चा केली आणि उपचार पद्धतीचीही माहिती घेतली.