
धाराशिव जिल्ह्यातील काही भागास बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे काढणी सुरु असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकासह फळबांगाचेही मोठे नुकसान झाले आहे.
जिह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडासह परिसरातील नांदगाव, इंदापूर, कडकनाथवाडी, खामकरवाडी, सटवाईवाडी, बावी तर कळंब तालुक्यातील शिराढोणसह परिसरात बुधवार, सायंकाळी 5 च्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसाने हजेरी लावली. शिराढोण परिसरात मोठय़ा प्रमाणात गारपिट झाली आहे.

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरासह इतर पिकाची काढणी सुरु आहे. मात्र ऐन सुगीच्या दिवसात या अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने या पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. तर आंबा फळबागेत मोहोर आणि काही प्रमाणात फळ लगडली आहेत. त्यामुळे या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने आंबा बागाचेही मोठे नुकसान झाले आहे.


























































