
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून प्रकरणातील चार दोषींना अखेर शुक्रवारी फासावर लटवण्यात आले. पहाटे 5.30 वाजता तिहार कारागृहात नराधमांना फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांनंतर अनेक न्यायालयीन लढायांनंतर ‘निर्भया’ला न्याय मिळाला. याबद्दल देशभरात समाधान व्यक्त होत आहे.
मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना तिहारमधील क्रमांक 3च्या तुरुंगात फाशी देण्यात आली. एकाच वेळी चार दोषींना फासावर लटकविण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. चौघांना फाशी देण्यासाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागविण्यात आले होते.
कारागृहाबाहेर लोकांची गर्दी
मध्यरात्री 4.30 पासून तिहार कारागृहाबाहेर महिला मानवाधिकार कार्यकर्त्या आणि लोकांनी गर्दी केली होती. ‘निर्भया’चे आईवडीलही हजर होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढय़ाला न्याय मिळाला याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले. लोकांनी मिठाई वाटत आनंद व्यक्त केला.
अखेरच्या क्षणापर्यंत ‘तारीख पे तारीख’
- 10 सप्टेंबर 2013 रोजी विशेष जलदगती न्यायालयाने चार नराधम दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. 2014 साली उच्च न्यायालयाने फाशीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही फाशी कायम ठेवली, परंतु कायद्यातील पळवाटा शोधत नराधम दोषींची फाशी लांबविण्यात येत होती.
- तब्बल तीन वेळा ‘डेथ वॉरंट’ काढण्यात आले. पहिल्यांदा 22 जानेवारी 2020 ही फाशीची तारीख ठरली. दुसऱयांदा 1 फेब्रुवारी, तिसऱयांदा 17 फेब्रुवारी अशा फाशीच्या तारखा ठरविण्यात आल्या. अखेर 20 मार्चला पहाटे 5.30 वाजता फाशी देण्याचे जाहीर केले गेले.
- दोषींच्या वकिलांनी शेवटपर्यंत फाशी टाळण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी मध्यरात्री 2.30 पर्यंत दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू होती. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोषींना फासावर लटकविले.
काय आहे प्रकरण…
- 16 डिसेंबर 2012 रोजी दक्षिण दिल्लीत हे भयंकर प्रकरण घडले. 23 वर्षीय पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर ‘ब्लू लाइन’ बसमध्ये सहा नराधमांनी बलात्कार करून बेदम मारहाण केली. तिच्याबरोबर असणाऱया मित्रालाही मारहाण केली. बेशुद्धावस्थेत दोघांना रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले.
- 11 दिवस दिल्लीत ‘निर्भया’वर उपचार सुरू होते. त्यानंतर सिंगापूरमध्ये उपचारांसाठी नेण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला.
- ‘निर्भया’च्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मोठे जनआंदोलन उभे राहिले. तत्कालीन ‘यूपीए’ सरकारने महिला अत्याचारविरोधी कायदा आणखी कडक केला.
- सहा नराधम आरोपींना अटक केली. न्यायालयीन लढाई सात वर्षे सुरू होती. एक नराधम राम सिंह याने तिहारमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. एक आरोपी अल्पवयीन असल्याने ज्युनाइल कोर्टाने त्याची मुक्तता केली. मुकेश सिंह (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षयकुमार सिंह (31) या चौघांना फासावर लटकविले.
बेटा, अखेर तुला न्याय मिळाला
‘माझी मुलगी आज असती तर ती डॉक्टर असती. मी डॉक्टरची आई असते. तिच्या फोटोला बिलगून मी म्हणाले, बेटा, तुला आज अखेर न्याय मिळाला,’ अशी प्रतिक्रिया ‘निर्भया’च्या आईने दिली. यावेळी त्या भावुक झाल्या होत्या. न्यायालय, सरकार आणि मीडियाचे आभार मानले. ‘नराधमांना फासावर लटकविल्यामुळे देशभरातील महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. अत्याचार करणाऱयांना गंभीर शिक्षा होते यावर जनतेचा विश्वास वाढेल,’ असे त्यांनी सांगितले.



























































