जनतेने अचानक खरेदी वाढवल्यामुळे किराणा मालाचे भाव वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर शहरात जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा नसला तरी लोकांची खरेदी वाढल्यामुळे किराणा दुकानातील माल लवकर संपत आहे. बंदच्या काळात परतीचे भाडे मिळत नसल्यामुळे जीवनावश्यक मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांचे भाडे वाढले आहे. त्याशिवाय मूळ उत्पादकांनी आपापल्या मालाचा भाव वाढवला असल्यामुळे बंदच्या काळात वस्तुंचे भाव वाढत चालले असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत म्हणजे १० दिवसाचा तर केंद्र सरकारने २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. दोन वेळा या घोषणा झाल्यानंतर लोकांनी जीवनावश्यक मालाची खरेदी करण्यासाठी भाजी मंडई, किराणा मोंढा आदि ‘ठिकाणी गेले दोन तीन दिवसांत प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमंडई आणि किराणा दुकानांसमोर पाय ‘ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी २१ दिवस घराबाहेर पडून 21 पुरेल एवढा धान्यसाठा आणि किराणा माल खरेदी करण्याचा सपाटाच लावला. त्यामुळे किराणा दुकानातील माल पटकन संपून गेला.

सरकारने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चालूच राहणार असल्याचे जाहीर केलेले असल्यामुळे गल्लीबोळातील लहान मोठी किराणा दुकाने, मोंढ्यातील दुकाने, दुधाच्या डेअऱ्या आणि औषधी दुकाने सुरूच आहेत. एवढेच नव्हे तर पेट्रोल पंपही चालू आहेत. मात्र गेली दोन तीन दिवसांत लोकांनी प्रचंड खरेदी करून घेतलेली असल्यामुळे आणि आता घराबाहेर पडणार्या लोकांना पोलिसांनी लाठ्या मारणे सुरू केलेले असल्यामुळे लोकांचे माल खरेदीसाठी घराबाहेर पडणे बंद केल्यामुळे गल्लीबोळातील दुकाने वगळता इतर जीवनावश्यक दुकानांवर, मेडिकल आणि पेट्रोल पंप या ‘ठिकाणी शुकशुकाटच आहे.

लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल
गल्लीबोळातील दुकानदारांनी मालाच्या किमती वाढवणे सुरू केले असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या संदर्भात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, किंचितशी भाववाढ झाली हे खरे आहे. परंतु, सरसकट मोठ्या प्रमाणात भाववाढ झालेली नाही. जी भाववाढ झाली त्यामागची कारणेही लक्षात घ्यावी लागतील. मूळात काही कारखान्यांनीच साखरेचे भाव थोडेफार वाढवले आहेत. शिवाय अनेक ‘ठिकाणाहून माल आणायला येथून रिकामे वाहन पाठवावे लागत आहे. पुर्वी एकाच बाजूचे भाडे द्यावे लागायचे आता दोन्ही बाजूचे भाडे द्यावे लागत आहे. सामान्य जनतेने जो माल महिनाभर पुरणार होता तो भीतीपोटी एक दोन दिवसांतच खरेदी करून घेतल्यामुळे माल लवकर संपला. नवीन मालाची आवक वाढवण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. सरकारने मालवाहतूक निर्विघ्न व्हावी यासाठी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आता सारे सुरळीत होऊ लागेल.