
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधीत रुग्णाचा दुसरा कोरोना चाचणी आहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. असे असले तरी नागरिकांनी आजूनही खबरदारी बाळगणे गरजेच आहे. संचारबंदीचे योग्य पालन करावे, सर्वांनी आपापल्या घरातच थांबावे, गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील 2 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या दोन्ही व्यक्तींना विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले असून त्यांच्या घरच्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या दोन्ही व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत 56 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 50 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 49 नमुने निगेटीव्ह व 1 नमुना पॉजिटीव्ह प्राप्त झाला आहे. अजून 6 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
जिल्ह्यात शिधा पत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू असून प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील कुटुंबांना माहे एप्रिलचे धान्य वाटप सुरू आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील कुटुंबांना प्रत्येकी 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. हे वाटप करताना ग्राम स्तरीय समित्यांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे. तसेच हे धान्य घरपोच देण्यासाठीची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.
नागरी क्षेत्राप्रमाणे ग्रामिण भागातही ग्रामस्तरीय समित्यांनी जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यासाठीची सुविधा उभारावी. सध्या वाहतुकीचे पास हे आरटीओ तसेच तहसिलदार यांच्यामार्फत देण्यात येत होते. आत हे पास फक्त पोलीसांमार्फत देण्यात येणार आहेत. या पाससाठी पोलीसांतर्फे covid19.mhpolice.in ही वेबलाईट तयार केले असून त्याद्वारे पास देण्याची व्यवस्था केली आहे.




























































