धारावीत धोका वाढला, कोरोनाचे 6 नवे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या 24 तासात  कोरोनाचे रुग्ण वाढले असून धारावीत आज कोरोनाचे 6 नवे रुग्ण सापडल्यामुळे धारावीत कोरोनाचा धोका वाढला आहे. धारावीत आतापर्यंत कोरोनाचे 28 रुग्ण सापडले असून त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माहीममध्येही 3 नवीन रुग्ण सापडले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा परिसर अत्यंत  दाटीवाटीचा आहे. धारावीत कोरोना प्रसार होत असून येथील अनेक झोपडपट्टांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. धारावीत आज कोरोनाचे 6 नवीन रुग्ण सापडले असून यातील 5 रुग्ण हे मुकुंदनगरमधील असून एक रुग्ण हा राजीव गांधी चाळीतील आहे. यात 5 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. दिल्लीतील मरकजमध्ये गेलेल्या दोघा व्यक्तींचा यात समावेश आहे. त्यांना या आधीच कोरेनटाईन करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, माहीममध्येही 3 कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. माहीमच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या 27 वर्षांच्या महिलेला कोरोना झाला असून ती ब्रीच कँडी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला आहे तर 59 वर्षांच्या पुरुषाला कोरोना झाला. वरळीच्या जिजामातानगरमध्ये खाटिकाचे काम करणाऱ्या माहीमच्या व्यक्तीचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.

सुश्रुषातील दोघा परिचारिकांना कोरोना

दादरमध्येही कोरोनाचे तीन रुग्ण सापडले असून त्यात दादरच्या सुश्रूषा रुग्णालयातील दोघा परिचारिकांचा समावेश आहे. दोघा परिचारिकांना याच रुग्णालयात आईसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दादरच्या केळकर रोडवरील 83 वर्षाच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. दादरमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता  6 झाली आहे.