ठाणे जिल्हा परिषदेची कर्तव्यपूर्ती; शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहाराचे धान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या संकटामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा सध्या बंद आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना नेहमी पोषण आहार दिला जातो. पण शाळाच बंद असल्याने विद्यार्थी सध्या घरी आहेत. अनेक शाळांमध्ये पोषण आहाराचे धान्य पडून आहे. हे धान्य विद्यार्थ्यांच्या हक्काचे असून ते त्यांना या संकटकाळात मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये म्हणून पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांच्या घरपोच दिले जात आहे. या योजनेमुळे जिल्हा परिषदेच्या 1331 प्राथमिक शाळांना याचा लाभ होणार आहे.

सध्या रेशन कार्डवर ग्रामीण भागातील गरजूंना धान्य देण्यात येत असले तरी अनेक भागात ते पोहोचलेले नाही. अशावेळी विद्यार्थ्यांना पोषण आहार हाच आधार सध्या वाटत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण , मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ या तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा फायदा मिळणार आहे. त्यात तांदूळ, डाळ तसेच कडधान्याचा समावेश आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे धान्य मिळण्यास सुरुवात झाली आहे.

गट शिक्षण अधिकाऱ्यांचा वॉच
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच शिक्षकांच्या समन्वयातून या धान्याचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. पोषण आहाराचे धान्य अनेक शाळांमध्ये पडून असून त्याचा योग्य तो विनियोग व्हावा यासाठी कोरडा पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली. दरम्यान या वितरण व्यवस्थेवर संबंधित गट शिक्षण अधिकार्‍यांचा वॉच राहणार आहे.

खर्डीत 572 विद्यार्थ्यांना वाटप
शालेय पोषण आहाराच्या शिल्लक असलेल्या अन्नधान्याच्या साठ्यातून खर्डी हायस्कूल मधील 572 विद्यार्थ्यांना खर्डी हायस्कूलमध्ये तांदूळ, मुगडाळ व चवळीचे सोशियल डिस्टनिंग ठेऊन संस्थेचे अध्यक्ष दिलीप अधिकारी, मुख्याध्यापक विलास साळवे व शाम देसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शाळेच्या कोठारात शालेय पोषण आहाराचा साठा कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पडून होता हा साठा उंदिर-घुस यांनी खाऊन फ़स्त करू नये यासाठी वरिष्ठाच्या आदेशाने विद्यार्थ्याना व्हाट्सएप ग्रुपवर मेसेज टाकून व निरोप पाठवून त्याचे वाटप करण्यात आले आहे.