डायलिसिस केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाची ‘कोरोना’ तपासणी बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना कोविड 19’ या आजाराचा संसर्ग ‘डायलिसिस’ यंत्राच्या माध्यमातून इतर व्यक्तींनादेखील होण्याचा धोका रोखण्यासाठी डायलिसिस करण्यासाठी येणाऱ्या सर्व व्यक्तींची प्राथमिक तपासणी अत्यंत काळजीपूर्वक आणि बंधनकारक करण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आले असून ते तात्काळ लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील 5 रुग्णालयांमध्ये ‘करोना कोविड 19’ बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र डायलिसिस व्यवस्था तात्काळ सुरू करण्यात आली आहे.

‘कोरोना कोविड 19’ विषयक संसर्ग पसरू नये, यासाठी महानगरपालिका सर्व दृष्टिकोनातून विचार करून सातत्याने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून करोनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व डायलिसिस सेंटर साठी काही नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या व्यक्तींना नियमित डायलिसिसची गरज असते, अशा व्यक्तींपैकी ज्या व्यक्तींना ‘कोविड करोना 19’ची बाधा झाल्याचे आढळून येईल, त्यांच्यासाठी रुग्णालयातील काही भाग पूर्णपणे वेगळा असेल; अशा पद्धतीची व्यवस्था तात्काळ सुरू करण्याचे निर्देश आज देण्यात आले आहेत. यानुसार 5 रुग्णालयांमध्ये अशी व्यवस्था आजपासून सुरू करण्यात आली आहे.  या पडताळणी दरम्यान काही लक्षणे आढळून आल्यास, त्यांना करोना बाधितांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणाऱ्या रुग्णालयात / केंद्रामध्ये उपचारार्थ तात्काळ पाठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शिवाय डायलिसिस केंद्रांच्या स्तरावरदेखील परिपूर्ण काळजी घेत करोना बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था सुरू करण्याची अनुमती संबंधित अटींसापेक्ष देता येणार आहे.

रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रुग्णालयांची यादी

1. बृहन्मुंबई महापालिकेचे कस्तुरबा रुग्णालय

2. महापालिकेचे केईएम रुग्णालय

3. महापालिकेच्या अखत्यारीतील सेव्हन हिल्स रुग्णालय

4. सैफी रुग्णालय

5. नानावटी रुग्णालय

अशी राहणार व्यवस्था

– जे कोरोना बाधित रुग्ण वरील 5 रुग्णालयांव्यतिरिक्त ‘करोना’साठीच्या इतर रुग्णालयात दाखल आहेत, त्यांना देखील डायलिसिसची आवश्यकता असल्यास केवळ डायलिसिस करण्यापुरते वरील 5 रुग्णांमध्ये पाठविता येईल. अशा रुग्णांच्या बाबत डायलिसिस झाल्यानंतर पुन्हा आधीच्या रुग्णालयात करोन विषयक उपचारार्थ परत न्यावयाचे आहे.

– ज्या डायलिसिस सेंटरमध्ये महापालिकेद्वारे निर्देशित करण्यात आलेल्या अटींचे व निर्देशांचे योग्यप्रकारे पालन होत नसल्याचे आढळून येईल; किंवा ज्या ठिकाणी वरील तपशील अनुसार निर्देशित केल्याप्रमाणे परिपूर्ण काळजी घेतली जात नसल्याचे आढळून येईल; अशा केंद्रांच्या बाबतीत संबंधित नियम व पद्धती नुसार तात्काळ कारवाई करण्यात येईल.