
रत्नागिरी येथील वालोपे परिसरात पेट्रोल पंपावर ट्रकच्या टायरमध्ये हवा भरताना टायर फुटल्याने हवेच्या दबावाने हवा भरणारा कामगार दूरवर फेकला जाऊन जमिनीवर आपटला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बाबू कन्नन तरमल ( वय 56)असे त्याचे नाव आहे. मुंबई गोवा महामार्गावर वालोपे येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला टायर पंक्चर काढण्याचे दुकान आहे. तेथे बाबू तरमल काम करतो. गुरुवारी सायंकाळी तो एका ट्रकच्या टायरमध्ये हवा भरत होता. टायरमध्ये हवा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने टायर फुटला. टायर फुटताच हवेच्या प्रचंड दाबामुळे बाबू दूरवर फेकला जाऊन जमिनीवर आपटला. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. येथील पेट्रोलपंप चालक आणि कामगारांनी त्याला चिपळूण येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


























































