
भंगारचा व्यवसाय असलेल्या पाच दुकानांना आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास बुलढाण्यातील चिखली शहरात घडली. चिखली शहरातील मध्यवस्तीत, आठवडी बाजाराजवळ असलेल्या मच्छी बाजारातील भंगाराच्या दुकानांमध्ये मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना रोखण्यासाठी सर्व लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर चिखली शहरात मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार मेडिकल व दवाखाने वगळून संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने मंगळवारपासून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार मंगळवारी संपूर्ण दुकाने बंद होती . मात्र दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील आठवडी बाजारातील काही भंगाराच्या दुकानांना अचानक आग लागली. सर्वत्र, सामसूम असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. आगीचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी शेख समदखा यांची भंगार दुकान व नजीर कुरेशी यांचे भंगाराचे गोडाऊन असल्याचे समजते. त्या ठिकाणी लागलेली आग पसरल्याचे सांगण्यात आले.




























































