
आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच समाजप्रबोधनाचे काम करणारे हजारो लोककलावंत कोरोनाच्या तडाख्यामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. हाताला काम नाही, खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे आणखी किमान 20 दिवस कसे काढायचे? असा प्रश्न या लोककलावंतांसमोर उभा राहिला आहे.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांच्या जत्रा आणि यात्रा मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत असतात. यामध्ये कला सादर करण्यासाठी या कलाकारांना जत्रा आणि यात्रांमध्ये बोलविले जाते. त्यामध्ये झालेल्या कमाईवरच कलाकार वर्षभर गुजराण करतात. नेमक्या याच काळामध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्याचा परिणाम गावोगावच्या जत्रा रद्द झाल्या आणि त्यामुळे लोककलावंतांचा हक्काचा रोजगार गेला. जत्रा आणि यात्रांचा हंगाम संपल्यानंतर थेट दिवाळी आणि गणेशोत्सवामध्ये कलाकारांना काम मिळणार आहे. त्यामुळे संसार कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात लोकगायक आणि लोकशाहीर गफूरभाई पुणेकर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष अमर पुणेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे जागरण-गोंधळ, वाघ्या-मुरळी, बॅण्ड पथक, संगीत जलसा, भारूड खडी गम्मत, सोंगी, नाथपंथी अशा कलाकारांची महाराष्ट्रातील संख्या 50 हजारांपेक्षा अधिक आहे. या कलाकारांना सध्या काम नसल्यामुळे रेशनचे धान्य खाऊन, उधारीवर दिवस काढावे लागत आहेत. याकडे सरकारनेही लक्ष दिले पाहिजे.
लॉकडाऊनमुळे अनेक लोककलावंतांचे जीवन विस्कळीत झाले आहे. नेहमीच आपले दुखः बाजूला ठेवून सर्वाचे मनोरंजन करणाऱया लोककलाकारांवर लॉकडाऊनमुळे मात्र दुखाचा डोंगर कोसळला आहे. कलेवर उदरनिर्वाह करणारा कलाकार कुटुंबातील जबाबदारीने हतबल झाला आहे. आज त्याच्याकरच उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


























































