कोल्हापूरातील पहिले दोन भाऊ-बहिणी रूग्ण कोरोना मुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात पुण्याहून आलेला पहिला कोरोना रूग्ण आणि त्याचा संसर्ग झालेली बहिण अशा दोघांचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आले. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या या दोघांना आज खाजगी रूग्णालयातून टाळ्यांच्या गजर आणि फुलांच्या वर्षावात तुळशीचे रोप देवून घरी सोडण्यात आले.

येथील मंगळवार पेठेतील भक्तीपूजानगर मध्ये पुण्याहून आलेल्या तरूणाला दि.26 मार्च रोजी कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या बहिणीचाही कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. हे दोन्ही कोरोना पाॅझीटीव्ह असलेल्या भागातील पाचशे मीटरचा परिसर प्रशासनाकडून सीलबंद करण्यात आला होता. तर या दोघां बहिण- भावाला सरनोबतवाडी येथील अथायू या खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. येथे रूग्णालयाचे मुख्य कार्य.अधिकारी डॉ. सतीश पुराणिक,नर्सिंगच्या अधीक्षक शीतल राणे, उप व्यवस्थापक राहूल खोत,कॅज्युलिटी इनचार्ज विजय महापुरे हे या दोघांवर उपचार करत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे,पूरक जीवनसत्वे,समुपदेशन आणि आयुर्वेदिकतेचीही पध्दती या 23 दिवसांत उपचारात वापरण्यात आल्याची माहिती डॉ.पुराणिक यांनी दिली.मुख्य रूग्णालयापासून बाजूला असणाऱ्या इमारतीत कोव्हिड-19 चा विलगीकरण कक्ष करण्यात आलेला होता.यामध्ये जीवनरक्षक यंत्रणेसह सर्व आपत्कालीन सुविधा तैनात ठेवण्यात आली होती. दरम्यान 15 दिवसानंतर या दोघांचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले होते.