
पैठण शहरात तरुणाचा गळा चिरुन खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नाथगल्लीतील एका घरात दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी ‘नागेबाबा बँक’ फोडून 5 किलो सोने लुटल्याची घटना घडली होती. याच प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा भोगलेला हा गुन्हेगार असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथगल्ली येथील एका घरात भाड्याने राहणाऱ्या शिवा लोखंडे याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांना जाणवले. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी ही मुलासह बाहेरगावी गेली होती. शिवा याचा मोबाईल लागत नसल्याचे त्याच्या बायकोने शेजारील रहिवाशांना पाहणी करण्यास सांगितले. मात्र त्यांच्या घराला बाहेरून कुलुप होते. मात्र दुर्गंधी येत असल्याने अखेर जागरूक नागरिकांनी पैठण पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कुलुप तोडून घराची तपासणी केली असता पलंगावर शिवा मृतावस्थेत आढळून आला. यावेळी त्याच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्यार चालवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
पोलिस अधिकारी गोरख भामरे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाची चक्रे गतीमान केली. संभाजीनगर ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक ‘डॉग स्काँड’सह दाखल झाले. शासकीय रुग्णालयात मृताची शवविच्छेदन करण्यात आले.
मयत शिवा लोखंडे याने काही साथीदारांच्या सहाय्याने 7 वर्षांपूर्वी शहरातील ‘नागेबाबा मल्टिस्टेट बँके’च्या गच्चीवर भोक पाडून सिनेस्टाईल तब्बल 5 किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने पळवले होते. पैठण पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करीत त्याच्यासह सर्व आरोपींना सोन्यासह अटक केली होती. न्यायालयाने त्यांना साडेचार वर्षांची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा पुर्ण करून आल्यावर शिवा लोखंडे याने स्वतःचा मँटाडोर एका शाळेत भाड्याने लावला होता. स्वतः चालक म्हणून तो काम करत विद्यार्थ्यांची ने-आण करत होता.


























































