संकट नव्हे संधी! लॉकडाऊनमध्ये प्रलंबित कामे लावली मार्गी, श्री विठ्ठल मंदिराला आली झळाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या जीवघेण्या विषाणूमुळे अवघ्या विश्वाची पावलं आणि चाक स्तब्ध झालीत. मात्र या लॉकडाऊनला संकट न समजता एक सकारात्मक संधी समजून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानने या संधीचे सोने केले आहे. गेल्या महिनाभरात देवस्थानने भाविकांच्या मूलभूत सेवासुविधांची प्रलंबित कामे पूर्णत्वास नेली असून लॉकडाऊननंतर श्री विठ्ठल रुखुमाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना हा बदल सुखावह असणार आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने 17 मार्च रोजी मंदिर दर्शनासाठी बंद केले. मंदिरातील भाविकांची वर्दळ बंद झाल्याने या संधीचे सोने करण्यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मंदिराच्या प्रलंबित कामाचा जम्बो प्लॅन तयार केला आणि कामाला सुरुवात केली हे करीत असताना कोरोनाच्या नियम अटींना कुठे तिलांजली मिळणार नाही याची विशेष दक्षता घेतली. भिंतीवरील रंग, स्वच्छ हवा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था, वायरिंग आदी कामांचा श्रीगणेशा केला.

screenshot_2020-04-22-18-43-49-501_com-google-android-gm

श्री विठ्ठल मंदिर हे अतिप्राचीन असले तरी काळानुरुप या मंदिराला वेगवेगळ्या प्रकारची रंगरंगोटी करण्यात आली होती. मुळ दगडी मंदिराचे नैसर्गिक सौंदर्य सर्वांग सुंदर असताना त्यावर दिलेल्या कृत्रिम रंगामुळे मंदिराचे सौंदर्य आणि पावित्र्यालाच गालबोट लागले होते. त्यामुळे मंदिर समिती व्यवस्थापनाने भिंतीवरील हे रंग हटविण्याचे काम हाती घेऊन ते एक महिन्यात पूर्ण केले आहे.

screenshot_2020-04-22-18-43-38-228_com-google-android-gm

भिंतीवरील रंग हटविल्याने मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. रंगाबरोबर मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर भाविकांना कोंदट वातावरणाचा सामना करावा लागत होता अन प्रकाश व्यवस्था देखील अंधुकशी होती त्यामुळे जुने एसी काढून त्याठिकाणी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन मंदिरामध्ये हवा खेळती ठेवण्याचा प्रयन्त केला आहे त्याशिवाय मंदिरात थेट सूर्य प्रकाश येईल अशी व्यवस्था केली आहे. रंग, हवा आणि प्रकाश व्यवस्था या तीन प्रमुख कामामुळे मंदिराचा चेहरामोहरा बदलला असून लॉकडाऊन नंतर श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हा बदल खूपच आनंद देणारा असणार आहे.

देवाच्या मूर्तीला वज्रलेप?
देवाच्या मूर्ती संवर्धनाचा विषय समितीच्या अजेंड्यावर असून शासनाकडे या अनुषंगाने प्रस्ताव पाठविलेला आहे. शासनाचा हिरवा कंदील आल्यास लॉकडाऊन संपण्यापुर्वी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींना वज्रलेप करुन घेण्याची मंदिर समितीची तयारी असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी सामनाला सांगितले.

लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंढरपूर नगर परिषदेने तीन दिवसांचा लॉकडाऊन पुकारला आज पहिला दिवस होता. या लॉकडाउनला पंढरपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.