
हिंगोलीतील राज्य राखीव दलाच्या मालेगाव येथे बंदोबस्त करिता गेलेल्या तुकडीतील सहा जवानांना हिंगोलीत परतल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या सहा जवानांसह मालेगाव व मुंबईहुन आलेल्या अन्य 188 एसआरपीएफ जवानांचे घशातील स्वॉब नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज 22 एप्रिल रोजी संध्याकाळी प्राप्त झाला असून 184 जवानांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरीत चार जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली.
मुंबई व मालेगाव येथे बंदोबस्तासाठी पाठविण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या तुकडीला हिंगोलीत परतल्यानंतर विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. शिवाय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, समादेशक मंचक इप्पर यांनी सर्व जवानांच्या विलागीकरणासाठी एसआरपी कॅम्पमध्ये सेंटर केले. तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने सर्व 194 जवानांचे लाळेचे नमुने तपासणीकरिता संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी सहा जणांना कोरोना झाल्याचे 21 एप्रिल रोजी उघडकीस आले होते. उर्वरित जवानांचा अहवाल आज 22 एप्रिलला प्राप्त झाला असून 184 जवानांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे. तर अन्य चार जणांचा अहवाल उद्या गुरुवारी प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.




























































