धान्याचे दरपत्रक दर्शनी भागात लावा, स्वस्त धान्य दुकानदारांना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांना किती धान्य मिळणार आहे, तसेच धान्याचे दर काय आहेत, ही माहिती ठळक व स्पष्ट दिसेल, अशा पद्धतीने दर्शनी भागात लावावी, अशा सूचना नगर जिल्हा पुरवठा विभागाने धान्य दुकानदारांना दिल्या आहेत. तसेच दुकानांमध्ये येणार्‍या नागरिकांशी संयमाने व सौजन्याने बोलावा, असे आवाहनही नगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आहे.

लॉकडाउनमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. तसेच लोकांचा संयम सुटत चाललेला असून सहनशीलतासुद्धा कमी झालेली दिसून येत आहे. अशा अवघड परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानदारांकडून समस्त लाभार्थ्यांना धान्याच्या अपेक्षा आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर दुकानदार खंबीरपणे आपले कर्तव्य बजावत आहात, ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे; मात्र, त्याचबरोबर दुकानदारांची जबाबदारीसुद्धा वाढलेली असून त्यांनी काही सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.

त्यामध्ये मोफत तांदूळ सर्वांना नियमाप्रमाणे मिळेल, याबाबत संवेदनशील राहावे, केशरी रेशनकार्डधारकांची नोंद दिलेल्या नमुना रजिस्टरमध्ये न विसरता घ्यावी, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी यांची ही यादी दर्शनी भागात लावावी, लोकांच्या अडचणी समजावून घेऊन आपल्या स्तरावर शक्यतो प्रश्‍न सुटतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, निर्देशाप्रमाणे केशरी रेशनकार्डधारकांच्या रेशनकार्डवर धान्य दिल्याबाबतचा शिक्का न विसरता मारावा, वीसपेक्षा जास्त व्यक्ती रांगेत उभ्या असल्यास त्यापुढील व्यक्तींना पंधरा जणांना एक तास या हिशेबाने तासातासाची वेळ ठरवून द्यावी व माघारी पाठवावे, रांगेत उभे व्यक्तीसुद्धा मास्क लावून एकमेकांमध्ये सुरक्षित वावर ठेवतील याबाबत दक्ष रहावे, गरीब लाभार्थ्यांना धान्य विहित दरात मिळेल, याबाबत संवेदनशील राहावे, अशा सूचनांचा समावेश असून त्यांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.