जिंतूरमध्ये सीसीआयमार्फत कापूस खरेदीला सोमवारपासून होणार सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूर बाजार समितीमध्ये सीसीआयमार्फत 4 मेपासून कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. कापूस खरेदी सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंतच सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद केली आहे. त्यांना बाजार समितीमार्फत फोनद्वारे किंवा एसएमएस करून वाहन खरेदी केंद्रावर घेऊन येण्याबाबत कळविले आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंद केलेली आहे व फोनद्वारे सूचना मिळाली आहे, अशा शेतकऱ्यांनीच कापूस विक्रीसाठी आणणे बंधनकारक आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सीसीआय ग्रेडर व जिनिंग मालक यांच्यासोबच मुख्यप्रशासक मनोज थिटे यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून कापूस खरेदी सुरू करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. खरेदीची सुरवात त्रिलोक कॉटन जिनिंगला होणार आहे. तसेच जिनिंग मालकांकडून खरेदी केंद्राच्या प्रवेशद्वारावरच शेतकऱ्यांना हात धुण्याची व्यवस्था करण्यात येईल, येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करूनच प्रवेश देण्यात यावा तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व बाजार समितीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी ज्या नावाने ऑनलाइन नोंदणी केलेले आहे त्याच नावाचा सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकसोबत घेऊन यावे, वाहनासोबत एकच शेतकरी असावा. तसेच चेहऱ्यावर रुमाल किंवा मास्क बांधलेले असावे, वाहनधारकांनी वाहनांमध्ये 10 ते 15 फूट अंतर ठेवावे, सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे बाजार समिती सचिव सतिश काळे यांनी सांगितले आहे.