
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
हिंदुस्थान ही चीनची मोठी बाजारपेठ आहे. चीनला आर्थिक युद्धाचीच भाषा कळते. हिंदुस्थान सरकारने चीनशी आर्थिक पातळीवर लढा द्यायचा ठरवला तर चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देता येईल. चीनमधील जे उद्योग आहेत तेच हिंदुस्थानात चालू करण्यास हिंदुस्थानींना प्रोत्साहन दिले तर हिंदुस्थानात रोजगार निर्माण होतील आणि चीनलाही दणका बसेल. चीनला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. सरकारने योग्य कार्यवाही करून चीनने पुकारलेल्या या युद्धात जशास तसे उत्तर दिले तर लॉक डाऊनमुळे मंदावलेली आपली अर्थव्यवस्था चांगली प्रगती करेल.
कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 हे जगावर लादले गेलेले जैविक महायुद्ध आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱयात पोहोचला आहे. त्यात हिंदुस्थानही आहे. कोरोना हा फक्त साथीचा आजार नसून जैविक युद्ध आहे आणि चीनने या युद्धतंत्राचा शिताफीने वापर केला आहे. सामरिक फायदा मिळण्याकरता चीन काहीही करू शकतो. जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर त्याने स्वत:च्या नागरिकांवर का केला? कारण उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोट दाखवले तर आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही या व्हायरसमळे फटका बसलाय असे चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील.
या सगळ्यांतून चीनला काय फायदा झाला? चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. अनेक विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. चीनने जगाला कोटय़वधी युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय सामानाची निर्यात केली. यावरूनच समजते की चीन किती तयारीत आहे. जागतिक महासत्ता बनायचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही, तर सामरिक ताकद आणि व्यूहरचनाही तितकीच प्रबळ असावे लागते. चीनला याची पुरेपूर जाणीव आहे. तेव्हा कोरोनामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत.
जुलै 2019 मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन यांनी अचानक अमेरिकेला भेट दिली होती. चीनने या भेटीवर सडकून टीका केली होती. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची ती पहिलीच अमेरिका भेट घाईगडबडीत झाली. या भेटीनंतर हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी आंदोलनाने जोर धरला. चीन या आंदोलनामध्ये अडकून पडला आणि चीनच्या पुढील सामरिक योजनांना खीळ बसली. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटीआधी चीनने तैवानजवळ लष्करी सरावांची तीव्रता वाढवली होती. या सगळ्या घटनाक्रमाचा सरळ अर्थ असा की, चीनने तैवानवर हल्ला करण्याची सगळी तयारी केली होती. त्यानंतर अमेरिकेने हाँगकाँगमधील आंदोलनाला पाठबळ देवून त्याची तीव्रता वाढवली. चीन स्वत:च्याच क्षेत्रीय संघर्षात अडकून पडला. अर्थात, हे किती खरे किंवा खोटे आहे हे अमेरिका किंवा चीनच जाणे. चीनने हाँगकाँगमधील आंदोलनामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप केला होता. त्याचा काटा चीनने कोरोनाच्या माध्यमातून काढला असे म्हणण्यास वाव आहे. ज्या प्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत गेला त्या प्रमाणात हाँगकाँगमधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हाँगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही. दुसरा फायदा अमेरिकेसोबत चीनचे जे व्यापारी युद्ध सुरू होते तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यात चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे, पण अमेरिका मात्र इमर्जन्सीमध्ये पुरती अडकली आहे.
आता या सगळ्यांचा हिंदुस्थानशी काय संबंध? हिंदुस्थान चीनचा महत्वाचा व्यापारी भागीदार असला तरी चीनला महासत्ता बनण्यात हिंदुस्थान हा एकच अडसर ठरतोय. त्यामुळे हिंदुस्थानबाबत चीनची भूमिका आधीपासूनच तुकडे पाडण्याची राहिली आहे. हिंदुस्थानचा अडसर बाजूला करण्यासाठी चीन कोणतीही पातळी गाठू शकतो. हिंदुस्थानात चिनी व्हायरसचा फैलाव होणे हे अपेक्षितच होते. परंतु तो थेट चीनमधून न येता इतर देशातून आला. त्यानंतर वैद्यकीय साहित्यांची चीनला होणारी निर्यात रोखून हिंदुस्थान सरकारने चीनला योग्य तो संदेश दिलाच आहे. मोदी सरकार या सगळ्यांसाठी तयार आहे, पण यात नागरिकांनीही आपले कर्तव्य बजावायला हवे.
सध्या सरकार सामाजिक स्तरावर अनेक उपाययोजना करत आहे. त्या सरकारने अवश्य कराव्यात. मात्र हे संकट कोणामुळे वाढले, याचाही मागोवा सरकारने नक्की घ्यावा. ज्या चीनची आसुरी मानसिकता आणि निष्काळजीपणा यामुळे हे संकट ओढवले, त्याविरोधात जनतेत संताप आणि असुरक्षिततेची भावना आहे. त्याचा लाभ घेऊन सरकारने चीनकडून आयात होणाऱया वस्तूंना देशांतर्गत पर्याय निर्माण करावा. गेल्या काही दिवसांत हिंदुस्थानी जनतेने चिनी मालाविरुद्ध संघटितपणे लढा दिला आहे. योग्य प्रबोधन केले तर जनता स्वदेशी उत्पादनांनाच प्राधान्य देईल. चिनी उत्पादनांची आयात पूर्णत: बंद केली तर ते आपल्या पथ्यावरच पडेल. हिंदुस्थान ही चीनची मोठी बाजारपेठ आहे. चीनला आर्थिक युद्धाचीच भाषा कळते. हिंदुस्थान सरकारने चीनशी आर्थिक पातळीवर लढा द्यायचा ठरवला तर चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देता येईल. चीनमधील जे उद्योग आहेत तेच हिंदुस्थानात चालू करण्यास हिंदुस्थानींना प्रोत्साहन दिले तर हिंदुस्थानात रोजगार निर्माण होतील आणि चीनलाही दणका बसेल. चीनला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. सरकारने योग्य कार्यवाही करून चीनने पुकारलेल्या या युद्धात जशास तसे उत्तर दिले तर लॉक डाऊनमुळे मंदावलेली आपली अर्थव्यवस्था चांगली प्रगती करेल.
कोरोनाचे हे सध्या सुरू असलेले जैविक युद्ध आणखी काही वर्षे चालेल. यातून सर्वांनी असा बोध घेतला पाहिजे की, यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सिमेवर लढले जाईल असे नाही तर ते तुमच्याआमच्या दारापर्यंत, घराघरात लढले जाईल. कोरोनाने दिलेला इशारा हाच आहे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. जगातील युद्धतंत्र बदलत आहेत. यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱयाचा आहे. येणारे दिवस आणखी बिकट असू शकतात. त्यामुळे एक नागरिक म्हणून, एक राष्ट्र म्हणून आपण येणाऱया काळाला कसे सामोरे जातो यावरच हिंदुस्थानचे भवितव्य अवलंबून असेल.





























































