
>> नीलेश कुलकर्णी
देशात सध्या सर्वत्र कोरोना संकटाचे ढग पसरले आहेत. मात्र अशाही परिस्थितीत ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे प्रकार काही राजकारणी मंडळी करीत आहेत आणि आपल्याच सरकारच्या चांगल्या कामावर पाणी फेरत आहेत. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे नेते जफरूल इस्लाम खान यांनी असेच बेताल वक्तव्य केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याकडे कानाडोळा केला तर भाजपने सवयीनुसार यातही राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला.
कोरोनामुळे देशभरात ‘आरोग्य आणीबाणी’ सारखी स्थिती आहे. हे संकट टळावे म्हणून सर्वच जण प्रार्थना करीत आहेत. हे संकट सगळ्य़ांच्या प्रयत्नाने टळेल ही, पण आपल्या राजकारणातील बेताल विधानांचा कोरोनाही देशभरात फैलावला आहे. त्याचे काय? भाजपतील अशा बेतालांना आवरण्यासाठी पंतप्रधानांनी वारंवार आवाहन केले, मात्र बेतालांचा ‘ताल’ काही सुधारला नाही. आता त्यात भर पडली ती दिल्लीच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष असलेल्या जफरूल इस्लाम खान यांची. वास्तविक कोरोनाच्या संकटात दिल्लीचे अरविंद केजरीवाल सरकार उत्तम काम करीत आहे. त्याला केंद्राचेही सहकार्य मिळत आहे. मात्र एक वादग्रस्त वक्तव्य करून जफरूल यांनी विनाकारण वाद ओढवून घेतला. या महाशयांनी हिंदुस्थानातील मुस्लिमांवरील कथाकथित अत्याचाराबाबत अरब आणि मुस्लिम राष्ट्रांकडे तक्रार केली तर कट्टरपंथी खाक होतील, असे बेताल वक्तव्य केले. साहजिकच मोठा वाद निर्माण झाला. खरतर आहे हा वाद लवकर निपटताही आला असता, मात्र आपल्याकडे प्रत्येक वादामागे ‘व्होटबँक’ असते, तीची काळजी घ्यावी लागते. म्हणून जफरूल बरळल्यानंतर सुशासनाचा नारा देणाऱया केजरीवालांनी त्यांना सरळ करण्या ऐवजी ‘सोयिस्कर मौन’ बाळगले. दूसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्याचे लागलीच राजकारण केले. जफरूल यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर आता राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाच्या साथीतही आपल्याकडे व्होटबँकेचे राजकारण दुर्दैवाने महत्वाचे ठरले.
कोरोनाचा धोका ओळखून केजरीवालांनी वेळीच योग्य ती खबरदारी घेतली. एकीकडे केजरीवाल चांगले काम करत असताना या जफरूल महाशयांना नसती अवसा आठवली आणि त्यांनी केजरीवाल यांच्या चांगल्या कामावर पाणी ओतले. दिल्लीत झालेल्या दंग्याची धग अजूनही कायम आहे. कोरोनामुळे धुसफूस कमी झाली असली तरी समाज दुभंगलेला आहे. अशा स्थितीत देश कोरोनासारख्या संकटाला सामोरा जात असताना जफरूल यांनी अरब राष्ट्रांची तळी उचलणे हे निषेधार्हच आहे. मात्र व्होटबँक महत्त्वाची असल्याने ‘आम आदमी पक्षान’ त्यावर भूमिका घेतली नाही. आयतीच ध्रुव्रीकरणाची संधी मिळाल्याचे पाहून एरव्ही गलितगात्र असलेला दिल्ली भाजप सक्रिय झाला. नंतर आपल्या फेसबुकवर जफरूल यांनी माफी मागितली असली तरी ‘जो बूंद से गयी को हौद से नही आती’. मतांचे राजकारण आणि ध्रुकीकरण काय करायचे आहे ते करा. मात्र त्यात देशाला ओढू नका.
भाषिक संकट…
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. केरळचे डाव्या पक्षाचे मुख्यमंत्री कॉ. विजयन यांनी या बैठकीवर बहिष्कार घातल्याने ती चांगलीच गाजली. त्याचवेळी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘मोदीजी आपल्याशी बोललेच नाहीत’, असा आरोप केला. ममतादीदींचा राग शांत होत नाही तोच एक रंजक माहिती या बैठकीच्या अनुषंगाने पुढे आली आहे. या बैठकीतला पंतप्रधानांचा संवाद हिंदीतून होता. मात्र मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांना अजिबात हिंदी येत नाही. त्यामुळे त्यांची अडचण झाली. त्यांचा क्रमांक आल्यावर त्यांनी मिझोरामची स्थिती इंग्रजीत मोठ्या दमदारपणे सांगितली. अर्थात, बैठकीत काय चाले आहे, हे मात्र त्यांच्या डोक्याकरून गेले. वास्तविक हिंदुस्थान हा वैविध्यपूर्ण देश आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी. अशाकेळी किमान हिंदी व इंग्रजीचा इंटरप्रिटर बैठकीला असावा हेही सरकारी बाबूंना का सुचले नाही, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. मिझोराममध्ये एक टक्क्याहून कमी लोक हिंदी बोलतात. कोरोनासंदर्भातली पंतप्रधानांची सगळी आवाहने आणि भाषणे हिंदीत होती आणि मिझोराम जनतेने ‘गूगल सर्च’मध्ये जाऊन काही शब्दांचे अर्थ शोधले. त्यात पंतप्रधानांनी उच्चारलेला ‘लक्ष्मण राम’ हा शब्द सर्वाधिक वेळेस शोधला गेला. त्या संपूर्ण राज्यासारखीच अवस्था मुख्यमंत्री जोरामथांगा यांची झाली. ईशान्येकडील राज्ये आणि दक्षिणात्य राज्यांमधली ‘हिंदीची समस्या’ नोकरशाहीच्या लक्षात येऊ नये, हेच दुर्दैव!
विपरित अर्थ
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, हा नारा पंतप्रधानांनी दिलेला आहे. प्रत्यक्षात भाजपचे नेते विपरित वागताना दिसत आहेत. कोरोनाच्या महामारीत सामान्य जनतेला एक न्याय आणि तालेवार मंडळींसाठी वेगळा न्याय, अशी उदाहरणे पुढे येत आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची ‘कोरोना टूर’ गाजली. आता बिहार विधानसभेतले भाजपचे प्रतोद अनिल सिंग यांचा कारनामा पुढे आला आहे. त्यांची कन्या उच्च शिक्षणासाठी राजस्थानच्या कोटामध्ये राहते. कोरोनाच्या संकटात अनेक गोरगरिबांची मुले विविध ठिकाणी अडकून पडली. त्यात कोटा येथून आपल्या कन्येला सरकारी गाडीत आणण्याचे फर्मान आमदारांनी सोडले. त्या हुकुमाचे ताबेदार म्हणून दोन सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हर बिहारच्या सीमा ओलांडून राजस्थानातून आमदार कन्येला सुरक्षित घरी घेऊन गेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर आमदार आणि भाजपवर सडकून टीका सुरू झाली. राज्याची सीमा ओलांडण्यासाठी सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. नोकरी महत्त्वाची म्हणून बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर आमदारांच्या आदेशावरून राजस्थानला गेले, पण आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कायदा हा फक्त गरिबांसाठीच लागू होतो, त्याचा हा आणखी एक पुरावा. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा अर्थ पंतप्रधानांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे.


























































