चिखली अर्बनकडून रोजगारापासून वंचित गरजूंना मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक दायित्व स्वीकारून समाजामध्ये काम करत असताना समाजऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून दि चिखली अर्बन को-ऑप बँक लि. चिखली बँकेचे अध्यक्ष श्री. सतीश गुप्त यांच्या नेतृत्वाखाली सदैव सामाजिक कामामध्ये पुढाकार घेऊन चिखली अर्बन बँक सदैव समाज सेवेसाठी तत्पर असते.

सद्यस्थितीत कोरोना संसर्गजन्य विषाणूमुळे आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या कुटुंबाना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यातच उद्योगधंदे व अनेक व्यापारी प्रतिष्ठान बंद असल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या रोजगारापासून वंचित झालेल्या श्रमजीवी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा गरजु कुटूंबासाठी मदत म्हणून दि. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी यांच्या वैयक्तिक आर्थिक योगदानातून “घरातील चूल विझू नये” यासाठी 1000 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा उपक्रम चिखली अर्बन बँक परिवाराने प्रारंभ केला आहे. यामध्ये दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक किराणा माल व इतर जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे. याकरिता बँकेच्या 300 पेक्षा अधिक सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला असून संचालक मंडळाने देखील वैयक्तिक आर्थिक योगदान दिले आहे.

या उपक्रमांतर्गत आज दहीद, गिरडा, जामठी, गोंधनखेड, मढ, अंभोडा या गावातील गरजु कुटूंबांना दि चिखली अर्बन बँकेकडून जेष्ठ संचालक श्री. पुरुषोत्तमजी दिवटे, श्री.शैलशजी बाहेती, कर्मचारी प्रतिनिधी श्री. शशांक पंधाडे, ह.भ.प. विठ्ठलमहाराज पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

देशातील कोरोनाच्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात या सर्व कुटुंबांच्या संपर्कात राहून आवश्यकतेनुसार पुन्हा साहित्य पुरवठा करण्याचा मानस बँकेचे अध्यक्ष श्री. सतीश गुप्त यांनी याप्रसंगी व्यक्त केला.