
मुंबईत रुग्णवाढ कायम राहिली असून गेल्या एकाच दिवसात तब्बल ८७५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकाच दिवसात नोंदवलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार ५६४ वर पोहोचली आहे. गेल्या एकाच दिवसात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीतही आज २६ नवीन रुग्ण सापडल्याने या ठिकाणच्या रुग्णांची संख्या ८५९ वर पोहोचली आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत झालेल्या ६२५ कोरोना चाचण्या आणि ७ व ८ मे रोजी झालेल्या चाचण्यांमधून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १९७ अहवालांचा समावेश असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मृत १९ जणांमध्ये १० पुरुष आणि ९ महिला आहेत. यातील १३ जणांना दीर्घकालीन आजार होते असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १९ मृतांमुळे मुंबईतील एकूण मृतांची संख्या ५०८ वर पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या एकाच दिवसात २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही ३००४ वर पोहोचली आहे.
उपचारासाठी क्ष – किरण अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर
कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत होणाऱ्या सुधारणेची तपासणी करण्यासाठी आता अत्याधुनिक क्ष-किरण आर्टिफिशीअल बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याचा प्रायोगिक तत्वावर वापर पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, पोदार रुग्णालय, एनएससीसाय डोम वरळी याठिकाणी रुग्णांवर करण्यात येत आहे. याचा तंत्रज्ञानाने आतापर्यंत तीन हजार रुग्णांचे एक्स – रे काढण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने रुग्णांची तपासणी वेगाने करता येणार आहे. शिवाय प्रकृतीची निश्चित स्थिती समजणार असल्याने उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. याची यशस्वीता पाहून वापर वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
























































