
कोरोना रोखण्यासाठी देशभरात दोन महिन्यांपासून लॉकडाउन आहे. कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यात प्रशासन गुंतलेले आहे. याचा गैरफायदा घेत जामखेड तालुक्यातील साकत शिवारात वन विभागाच्या गट नंबर 1088 शेतजमिनीवर काही कुटुंबांनी अतिक्रमण करून पत्र्याचे शेड तयार केले. तसेच एक हेक्टर जमीनीची नांगरणीही केली. ही गोष्ट वनविभागाला समजताच वनविभागाने गुरुवारी बंदोबस्तात अतिक्रमण हटविले.
साकत शिवारात मोठ्या प्रमाणावर वनविभागाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रावर काही कुटुंबांचा अनेक दिवसांपासून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा परिसर वनराईने नटलेला होता. काही कुटुंबांनी 10 वर्षांपूर्वी हा परिसर ओसाड केला आहे. एका वर्षी शेतजमीनीची नांगरणी करून पेरणीही केली होती. मात्र, वनविभागाने व ग्रामस्थांनी पीक नष्ट करून पुन्हा वनविभागात अतिक्रमण करू नका असे बजावले होते. या भागातील सर्व झाडे तोडून शेतजमीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या लॉकडाउनमुळे प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. याचा गैरफायदा घेत काही कुटुंबांनी या ठिकाणी काही भागात नांगरणी केली आणि पत्र्याचे शेड करून राहू लागले. ही गोष्ट वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड, साकतचे सरपंच हरीभाऊ मुरुमकर, वनपाल, वनरक्षक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पत्र्याचे शेड नष्ट केले आणि गवत व कडबा नष्ट करून वनविभागात पुन्हा अतिक्रमण करू नये असे बजावले.






























































