लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बीडमध्ये रस्त्यावर तुफान गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्हा प्रशासनाने संचारबंदी शिथिलतेचा वेळ वाढवावा. आम्ही सर्व नियम अन अटी पाळून सहकार्य करू असं छातीठोकपणे सांगणाऱ्या बीडच्या व्यापाऱ्यांनी सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत. कुठेही सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर, दुकानांसमोर चौकोन यांचा वापर न करता विक्री केल्यामुळे नुसती गर्दीच पाहायला मिळाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडच नव्हे तर देशातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे भूमिका सातत्याने मांडली. बीडच्या प्रशासनाने संचारबंदी शिथिलतेच्या वेळेत बदल करावा अशी भूमिका मांडली. काहीवेळा पोलीस तर काहीवेळा नगर पालिका किंवा महसूल प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना त्रास दिला म्हणून आवाज उठवला. दोन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांवर पोलिसांनी हात उचलल्यानंतर व्यापारी संतप्त झाले होते. मात्र शुक्रवारी बीडच्या बाजारपेठेत जे दृश्य दिसले ते क्लेशदायक असेच होते.

दुकान मग ते कपड्याचे असो की सोन्या चांदीचे, चप्पल बुटाचे किंवा जनरल स्टोअर्स प्रत्येक दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जे व्यापारी प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत मोठमोठ्या गप्पा मारत होते त्यांच्याच दुकानात नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. कोणत्याही दुकानासमोर चौकोन केलेले नव्हते. ठराविक अंतरावर लोक उभे नव्हते. सर्वत्र गर्दी, झुंबड असे चित्र होते. वास्तविक पाहता दुकानात येणाऱ्या ग्राहकाला ठराविक अंतर ठेवायला सांगणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे ग्राहक अन व्यापारी दोघांच्या हिताचे आहे. मात्र या गोष्टीची खबरदारी व्यापारी अन जनतेने घेतली नाही, असं बीड शहरात आढळून आलं आहे.