
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 26 जणांचे अहवाल रात्री निगेटिव्ह आल्याने कळंबवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शनिवारी 12 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
कळंब तालुक्यातील पाथर्डी येथे मुंबईहून रेड झोनमधून आलेल्या पती-पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील दोन मुली, आई , भाऊ अशा चारजणांचे स्वॅब घेण्यात आले होते. तसेच कळंब शहरातील शिवाजी नगरमधील एका महसूल कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या 22 असे एकूण 26 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट शनिवारी आले असून ते निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शनिवारी आणखी 12 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून पाथर्डी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ईटकुर येथील चार तर कळंबच्या रुग्णाच्या संपर्कातील दोनजण तर मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या संपर्कातील हावरगाव येथील नातेवाईकांचे चार व शहरातील इतर दोन असे 12 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल रविवारी मिळतील. असे आरोग्य अधिकारी डॉ. वायदंडे यांनी सांगितले.
पाथर्डी येथील पती पत्नीच्या कोरोना पॉझिटिव्ह दोन मुलींचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे मुलींना डॉक्टरांनी सांगताच त्या मुलींनी डॉक्टरांनाच लोटांगण घातले. डॉक्टर, आम्ही देव पाहिला नाही, पण तुम्हीच आमचे देव आहात अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. रेड झोनमधून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ होळे यांनी केले आहे.






























































