हिंदुस्थानातील साखर उत्पादन घटले, मागच्या वर्षीच्या तुलनेत 61.54 लाख टनने उत्पादन कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात वाढत असलेल्या कोरोनाचा फटका आता देशातील साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनादेखील बसला आहे. 1 ऑक्टोबर 2019 ते 15 मे 2020 या जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीत देशात फक्त 264.65 लाख टन साखर उत्पादन झाल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोशिएशने (इस्मा) दिली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जवळपास 326.19 लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदा साखर उत्पादन सुमारे 61.54 लाख टन इतके कमी झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी 15 मेला जवळपास 63 साखर कारखान्यांनी हे उत्पादन केले होते. तर यंदा फक्त 38 साखर कारखान्यांचा समावेश होता.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशने 15 मे 2020 पर्यंत 122.28 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक 5.48 लाख टनने अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत उत्तर प्रदेश येथे 116.80 लाख टन साखरेचे उत्पादन प्राप्त झाले होते. आतापर्यंतच्या उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक साखर उत्पादनाची नोंद करण्यात आली असल्याचे यावेळी इस्माडून जाहीर करण्यात आले होते. सन 2017-18 मध्ये हेच प्रमाण 120.45 लाख टन इतके होते.

तर महाराष्ट्राच्या उत्पादनाची माहिती देताना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात उत्पादन कमी झाले आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राने 60.87 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर मागच्या वर्षी हेच प्रमाण 107.15 टक्के इतके नोंदविण्यात आले हाते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात 46.3 लाख टन उत्पादन कमी झाले आहे. महाराष्ट्रातील 145 साखर कारखान्यांनी त्यांचे उत्पादन 30 एप्रिलपर्यंतच पूर्ण केले असल्याचे सांगण्यात येत आहे. 15 मेपर्यंत फक्त एकच साखर कारखाना काम सुरु ठेवले होते. तर गुजरातमध्येदेखील मागच्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमी झाल्याचे यावेळी नोंदविण्यात आले होते. यंदा 11.21 लाख टन इतके साखर उत्पादन पूर्ण करण्यात आले आहे. हे प्रमाण गेल्यावर्षी 9.28 लाख टन इतके होते.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांनी एकत्रितपणे 15 मे 2020 पर्यंत 32.75 लाख टन इतके साखर उत्पादन घेतले असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 42 लाख टन साखर मे 2020 पर्यंत निर्यात करायची आहे. त्यातील 36 लाख टन साखर अगोदरच निर्यात करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ही साखर इंडोनेशिया आणि इराण येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर केंद्र सरकारने ठरविल्याप्रमाणे अतिरिक्त ऊसाचे आणि साखरेच्या उत्पादनाचा वापर हा इथेनॉलसाठी केला जाणार असल्याने सर्व साखर उत्पादक आणि कारखान्यांचे लक्ष सरकारच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.