लॉकडाऊनचा फायदा घेत मराठी तरुणाची मोठी झेप, वाचा पर्यावरण दिनाची ही खास बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संकटाच्या काळातही सर्जनशील हात सतत काही ना काही उत्तम करत असतात. चंद्रपूरच्या अशाच ध्येयवेड्या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात एक स्टार्ट-अप तयार केले आहे. बांबू हस्तकलेच्या माध्यमातून राखी आणि अन्य गिफ्ट आर्टिकल तयार करणाऱ्या या युवकाने स्वतःची कंपनी स्थापन करून लॉकडाउन काळातही मोठी झेप घेतली आहे.

5 जून जागतिक पर्यावरण दिन. चंद्रपूरच्या आसपास असलेल्या संपन्न जंगलात बांबू उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. आता तर बांबू ‘लाकूड’ या श्रेणीतून ‘गवत’ श्रेणीत आणले गेल्याने बांबूची लागकवड व त्याची तोडणी सोपे काम झाले आहे. याच स्थितीचा फायदा घेत लॉकडाऊनच्या संकट काळातही एका चंद्रपूरकर तरुणाने स्वतःचे स्टार्टअप तयार करून हजारो तरुणांसाठी आशेचा किरण दाखविला आहे. ‘बांस’ विथ नेचर.. असे नाव असलेल्या चंदन कस्तुरवारच्या या कंपनीने शहरालगतच्या लोहारा येथे आपला कारखाना उभारला आहे. बांबू जंगल साखळीतला सर्वात स्वस्त व उत्तम गिफ्ट आर्टिकल निर्मिती करणारा घटक आहे. याच बांबूचा वापर करून चंदन कस्तुरवारने ही कंपनी स्थापन करून सुमारे वीस हातांना रोजगार दिला आहे. बांबू लागवड व त्याची तोडणी सोपी झाल्याने तो कापल्यानंतर पर्यावरणाचा कुठलाही -हास होत नाही आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने गिफ्ट आर्टिकल बनवून नव्या डिझाईनला संगणकीय जोड देत हा प्रकल्प वेगाने पुढे जात आहे. पुढच्या काळात ‘राखी’चा मोठा सण येऊ घातला आहे. राखीचा हा बाजार कॅश करण्यासाठी लोहारा येथील ‘बांस’ च्या कारखान्यात जय्यत तयारी सुरू आहे.