
>> नीलेश कुलकर्णी
भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले. मात्र सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल झाले ते मनोज तिवारी. लॉक डाऊनचे नियम तोडून या तिवारींनी क्रिकेटचा आनंद लुटला खरा, पण त्यांच्या पदाची ‘विकेट’ कशी गेली हे त्यांनाही समजले नसावे. अर्थात दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाचे खापर कोणावर तरी फोडून त्याला ‘बळीचा बकरा’ बनवले जाणार होतेच. तो शोध मनोज तिवारींपाशी येऊन थांबला इतकेच. यानिमित्ताने भाजपमध्ये फेरबदलाचे वारे सुरू झाले, असे मानायला हरकत नाही.
भारतीय जनता पक्षाच्या तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले. दिल्ली, छत्तीसगड आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये खांदेपालट झाला. मात्र पक्षांतर्गत आणि सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली ती भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांची. लॉक डाऊनचे सगळे नियम तोडून तिवारी महाशयांनी क्रिकेटचा आनंद लुटताना एका मॅचमध्ये भरपूर धावा केल्या. मात्र इकडे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तिवारी यांच्या पदाची `विकेट’ अलगद काढली. हे तिवारी यांच्या लक्षातही आले नाही. एखाद्या नेत्याचे पद जाणे वाईट, मात्र तिवारींची ज्या पद्धतीने सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे हे अधिक खेदजनक आहे. लॉक डाऊनच्या कॉस्ट किंटगमध्ये तिवारींची नोकरी गेली, तिवारींनी बिहारला सुखरूप पोहचण्यासाठी आता सोनू सूदशी संपर्क साधावा, मनोज तिवारींच्या हकालपट्टीने आम आदमी पार्टीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अशा पद्धतींच्या कॉमेंट्सचा सध्या धुमाकूळ सुरू आहे. या सगळ्याला मनोज तिवारींची कार्यपद्धती जबाबदार असली तरी त्यांना बळीचा बकरा बनवला गेला आहे हे नक्की. स्टारडमची हवा तशीही तिवारींच्या डोक्यात होतीच. शिवाय विचारधारा वगैरेशी दुरान्वयेही संबंध नव्हता. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात 2009 मध्ये समाजवादी पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढविणार्या तिवारींना भाजपने गोमूत्र टाकून `पावन’ करून घेतले आणि थेट दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष बनवले. दिल्लीतील बिहारी आणि पूर्वांचलच्या लोकांची मोठी संख्या लक्षात घेऊन तिवारींना ‘प्रोजेक्ट’ करणे भाजपलाही महागात पडले. विधानसभा निवडणुकीत अरिंवद केजरीवाल यांनी भाजपची पुन्हा धुळधाण उडवली. वास्तविक या निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकत पणाला लावली होती. जेएनयू, शाहीनबागच्या प्रकरणालाही फोडणी देण्यात आली. साम, दाम, दंड भेद वापरूनही केजरीवालांनी दिल्लीत भाजपाला पालापाचोळ्यासारखे उडवून लावले. तसे पाहिले तर हा पराभव तिवारींऐवजी भाजपचा होता. ‘विधानसभा निवडणुकीत मी माझ्या मर्जीने एक सीट बसवू शकलो नाही’, ही खंत मनोज तिवारी खासगीत बोलून दाखवायचे. मात्र पराभवाची जबाबदारी बड्या नेत्यांवर कशी ढकलता येणार? त्यामुळे मनोज तिवारींना बळीचा बकरा बनवण्यात आला. केजरीवाल दिल्लीत सत्तेत आल्यापासून भाजपची परंपरागत व्होटबँक असलेली बनिया आणि पंजाबी लॉबी भाजपपासून `सोशल डिस्टन्सिंग’ पाळून आहे. पैसाअडका असणार्या या ही मंडळींमुळे केजरीवालांना त्यांचा फायदा झालाच. आता ही व्यापारी मंडळी पुन्हा पक्षाकडे आर्किषत व्हावी म्हणून आदेशकुमार गुप्ता या माजी महापौरांना तिवारींच्या जागी संधी देण्यात आली आहे. अर्थात तिवारींचा बळी चढविल्याने मूळ प्रश्न सुटणारे नाहीत. दिल्लीबरोबरच छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमणिंसग यांचे निकटवर्तीय माजी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साय यांना विक्रम उसेंडी यांच्या जागी, तर मणिपूरमध्ये भावनानंद यांच्या जागी टिकेंद्रसिंह यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले आहे. जगतप्रकाश नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तरी पक्षसंघटनेवर त्यांची छाप दिसत नव्हती. या नव्या नियुक्त्यांनी `नड्डा पर्व’ सुरू झाले असे मानायला हरकत नाही.
पीआयबीचे ‘फॅक्ट चेक’
टीका ही कोणत्याही सरकारला आवडत नसतेच. देशाचे विद्यमान सरकार तर टीकेला चांगलेच वचकून आहे. सरकारवर जर टीका केलीच तर भक्तमंडळी देशद्रोह्याचा शिक्का शिक्के घेऊन बसलेलीच आहे. अशी मीडियासह आम आदमीची अवस्था आहे. लॉक डाऊन ज्या चुकीच्या पद्धतीने सरकारने लागू केला आणि एकंदरीतच कोरोनाचा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला त्यावरून मीडिया आणि सोशल मीडिया सरकारवर तुटून पडला आहे. सोशल मीडियाचा जो ब्रह्मराक्षस निर्माण केला होता तो आता सत्तापक्षावरच उलटताना दिसत आहे. हिमाचलचा पीपीई कीट घोटाळा मीडियाने वाजवला आणि गुजरातच्या व्हेटिंलेटर घोटाळ्यावरही जोरदार फोकस केला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मेहरबानीमुळे श्रमिक ट्रेन चुकीच्या मार्गावर धावत आहेत. या रेल्वेच्या अकार्यक्षमतेचा बुरखाही मीडियाने फाडला आहे. मीडिया आता हात धुवून मागे लागला आहे हे लक्षात येताच मीडियातल्या बातम्या कशा चुकीच्या आहेत, हे सिद्ध करण्यासाठी सरकारातली चाणक्य मंडळींनी एक नामी शक्कल लढवली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो या सरकारी यंत्रणेची मदत घेत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याने ‘पीआयबी फॅक्ट चेक’ नावाचे एक ट्विटर हँडल सुरू केले आहे. सरकार आणि विशेषत: भाजप विरोधातली बातमी दिसली की तिचे ताबडतोब खंडन करण्याचे काम सध्या सुरू आहे. गुजरातमध्ये व्हेंटिलेटर गिफ्ट मिळाले होते, घोटाळा झालेला नाही. श्रमिक एक्सप्रेस त्यांचा रूट चुकलेल्या नाहीत, असे दावे `सरकारी पोपट’ बनलेले पीआयबी फॅक्ट चेक करीत आहे.
फोगाट यांचा ‘टिकटॉक तोरा’
तारतम्याने वागा, ही ‘मन की बात’ पंतप्रधानांनी हजारवेळा सांगूनही भाजपच्या नेतेमंडळीच्या डोक्यात काही ती शिरताना दिसत नाही. केंद्रीय मंत्री रेणुकासिंग यांच्या अरेरावीचा अनुभव छत्तीसगडने नुकताच घेतला. आता हरयाणात भाजपच्या नेत्या ‘टिकटॉक स्टार’ सोनाली फोगाट यांनी बाजार समितीचे अधिकारी सुल्तानिंसग यांची `खेटरपूजा’ केल्याने खळबळ उडाली आहे. ही स्टारडम मंडळी हल्ली नवदेशभक्त म्हणून उदयाला आली आहे. एका तोर्यात ही मंडळी वावरत असते. सोनाली फोगाट त्यापैकीच एक. ‘टिकटॉक स्टार’ बनून महान असे ‘सामाजिक कार्य’ केले म्हणून भाजपने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले. जनतेने त्यांचे हे `महान कार्य’ नाकारून त्यांना प्रेमाने घरी बसवले. पण स्टारडम काही स्वस्थ बसू देत नाही. शेतकर्यांचे प्रश्न घेऊन बाई कमरेला पदर खोचून प्रशासनाशी भांडायला गेल्या. गंमतीचा भाग म्हणजे त्या राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे याचा विसर त्यांना पडला. अपशब्द बोलला म्हणून या फोगाटबार्इंनी त्या अधिकार्याला चपलेने बडवले. आता त्यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल झाली आहे. मात्र असा ड्रामा करण्याची फोगाट यांची ही पहिली वेळ नाही. निवडणूक प्रचारात ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिली नाहीत तर पाकिस्तानात निघून जा, असा राष्ट्रप्रेमी सल्ला त्यांनी दिला होताच. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर या प्रकरणी काही कारवाई करतील, ही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. त्यामुळे सोनाली फोगाट यांच्यासारख्यांची अरेरावी सहन करण्यावाचून जनतेपुढे सध्या तरी काही पर्याय नाही.
























































