धारावी सावरली! गेल्या 8 दिवसांत एकही मृत्यू नाही, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत गेल्या आठ दिवसात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे. मिशन धारावीतर्फे पालिका आणि खासगी डॉक्टरांनी राबवलेल्या मोहिमेत आतापर्यंत साडेपाच लाखांहून जास्त लोकांची तपासणी करण्यात आली आहे. मिशन धारावी मोहिमेला यश येत असून कोरोनाचा हॉटस्पॉटस ठरलेली धारावी आता सावरत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत धारावीत 1924 कोरोना रुग्ण आढळले असून ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत अत्यंत दाटीवाटीने वेढलेली घरे असल्यामुळे कोरोनाचा प्रसारही या परिसरात वेगाने झाला. मात्र, राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने जोरदार मोहीम राबवत कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यात यश मिळवले. मिशन धारावीअंतर्गत फिव्हर क्लीनिक, आयसोलेशन आणि कोरेन्टाईन व्यक्तींसाठी कोरोना सेंटर्स, घरोघरी जाऊन तपासणी, ज्येष्ठांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ते लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी पूर्णवेळ पाच रुग्णालये तसेच पालिका, खासगी शाळा, क्रीडा संकुलामध्ये आयसोलेशन आणि कोरेन्टाईन व्यवस्था करण्यात आली. कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत साडेपाच लाखांहून जास्त लोकांची तपासणी करण्यात आली. यात कोरोनाच्या 7 हजार चाचण्या करण्यात आल्या तर आतापर्यत साडेआठ हजार लोक शाळा, क्रीडा संकुलात आयसोलेशनमध्ये आहेत तर 38 हजार लोक होम कोरेन्टाईनमध्ये आहे. कोरोना रुग्णांना शोधून त्यांना आयसोलेट करणे आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना तातडीने कोरेन्टाईन करणे, यामुळे रुग्ण संख्या कमी झाली असून मृत्यू दरही कमी झाला आहे, अशी माहिती जी/उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

डबलिंग रेट 44 दिवसांवर

धारावीत कोरोनाचा संसर्ग जरी मोठ्या प्रमाणात झाला तरी मिशन धारावीमुळे त्याला नियंत्रित करण्यास पालिकेला यश मिळाले आहे. याचाच परिणाम म्हणून धारावीत आता एकापासून दुसऱ्याला कोरोनाचा संसर्ग होण्याचा डबलिंग रेट 44 दिवसांवर आला आहे. मुंबईतील हा सर्वात जास्त डबलिंग रेट आहे. त्याचबरोबर दर दिवशी कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही 1.6 टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण मुंबईतील सर्वाधिक कमी प्रमाण आहे.

शरीराबरोबर मन स्वास्थ्यावर भर

धारावीत दाटीवाटीच्या जागा असूनही ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांना आयसोलेशन आणि कोरेन्टाईन ठेवण्यात आले त्या ठिकाणी रुग्णांना शरीराच्या स्वास्थ्याबरोबर मनाच्या स्वास्थ्यावरही भर देण्यात आली. योग, प्राणायाम, ध्यानधारणा, हास्य थेरपी तसेच मनाला आनंद देणाऱ्या गायन तसेच अंताकक्षरीवर भर देण्यात आल्यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही मोठे आहे.