
संभाजीनगरातील बहिण-भावाच्या हत्येचे गुढ उकलले असून चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुण्याने या दोघांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चुलत भाऊ सतीश काडू राम खंदाडे (20) आणि त्याचा मेहुणा अर्जुन पूनम चंद राजपूत (25) यांनी दोघांचे गळे चिरले. पैसे आणि सोन्याच्या लोभापायी त्यांनी हे कृत्य केल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे.
बुधवारी बहीण-भावाचा गळा चिरून घरातील सव्वा किलो सोने तसेच दहा हजार रुपये रोख पळवण्यात आले. सातारा परिसरातील एमआयटी जवळ घडलेल्या या दुहेरी हत्तीने शहरात एकच खळबळ उडाली. दोघा बहीण-भावाचे गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये आढळले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. सातारा परिसरातील अल्पाइन हॉस्पिटलजवळ जालना जिल्ह्यातील लालचंद राजपूत यांचा दुमजली बंगला आहे. राजपूत हे शेतीच्या कामासाठी कुटुंबासह जालना येथे गेले होते. घरी त्यांची मुलगी किरण (19 वर्षे) आणि मुलगा सौरभ (17 वर्षे) हे दोघे जण होते. मंगळवारी रात्री आठ वाजता लालचंद राजपूत यांच्या पत्नी अनिता आणि दुसरी मुलगी पजेरो गाडीतून घरी आल्या. बराच वेळ हॉर्न वाजवूनही दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्यांनी उतरून पाहिले असता दरवाजा उघडाच असल्याचे दिसले.
बाथरूममध्ये रक्ताचे थारोळे घरात रक्ताचा थेंब नाही
लालचंद राजपूत यांच्या पत्नी आणि मुलीने घरात प्रवेश केला तेव्हा, त्यांना दोन्ही मुले दिसली नाहीत. घरात शोध घेतला तेव्हा बाथरूम मधील दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. किरण आणि सौरभ या दोघांचे गळे चिरून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे बाथरूममध्ये रक्ताचे थारोळे साचले होते. पण घरात कोठेही रक्ताचा एक थेंबही नव्हता.




























































