चीनमध्ये वाढतेय पुरुषांची संख्या; शास्त्रज्ञ म्हणतात, महिलांनी अनेक नवरे करावेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचं केंद्र असलेल्या चीनमध्ये सध्या एका महिलेने अनेक नवरे करावेत, अशी मागणी होताना दिसत आहे. चिनी अर्थशास्त्रज्ञ यी कांग एनजी यांनी हा सल्ला दिला आहे.

चीनमध्ये सध्या लैंगिक असमानता प्रचंड वाढली आहे. पुरुषांचा जन्मदर अधिक असल्याने तिथे महिलांची संख्या तुलनेने कमी आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर 2050पर्यंत चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित राहतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी काही काळ महिलांना एकाहून अधिक नवरे करण्याचा अधिकार देण्यात यावा, असा सल्ला चिनी अर्थशास्त्रज्ञ यी कांग एनजी यांनी दिला आहे.

यी कांग हे फूदान विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांच्या वाढत्या संख्येमुळे अविवाहित पुरुषांमध्ये तीव्र स्पर्धा होईल. यात वयाचं बंधन नसेल. त्यामुळे त्यातील बहुतेकांना अविवाहित राहावं लागेल आणि त्यांच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम होईल. त्यामुळे महिलांना एकाहून अधिक लग्न करण्याची मुभा द्यावी. तसंच, वेश्याव्यवसायही कायदेशीर करावा, असा सल्ला यी कांग यांनी दिला आहे. महिलेने एकाहून अधिक लग्न करण्याची प्रथा तिबेटमध्ये आहे. असे अनेक लोक असतील ज्यांना पत्नी नसण्यापेक्षा सामायिक पत्नी असणं चालू शकेल, असं गृहितकही यी कांग यांनी मांडलं आहे.